बांदा /राकेश परब : शहापूर तालुक्यातील बऱ्याच गावात इंटरनेट आणि दळणवळणाची सुविधा नाही. यासाठी कोकण संस्थेच्या माध्यमातून आणि रोटरी क्लब बॉम्बे चेंबूर वेस्टच्या सहकार्याने युवा किरण प्रोजेक्ट शेंडेगावत चालू आहे. महाराष्ट्रात आता लॉकडाऊन नंतर शाळा सुरू झाल्या असून बऱ्याच विद्यार्थ्यांकडे स्कुल किटचा अभाव आहे लक्षात घेऊन कोकण संस्थेच्या माध्यमातून आज २५ विद्यार्थ्यांना स्कुल किट वाटप करण्यात आले.
शेंडेगावात युवा किरण प्रोजेक्ट च्या ठिकाणी आयोजित कार्यक्रमात महिलांच्या समस्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले तर विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात रोटरी क्लब बॉम्बे चेंबूर वेस्टचे प्रेसिडेंट आनंदोथ मोहन, डॉ. सुप्रिया पाटील, श्रीकांत भट, आशा जनार्दन यांनी मार्गदर्शन केले.
शहापूर हा आदिवासी असून येथिल विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात घेऊन जाण्यासाठी रोटरीच्या वतीने कायम मदत केली जाईल असे यावेळी रोटरी प्रेसिडेंट आनंदोथ मोहन यांनी सांगितले यावेळी कोकण संस्था आणि रोटरी क्लब बॉम्बे चेंबूर वेस्टच्या वतीने २५ विद्यार्थ्यांना स्कुल किट, शालेय साहित्य आणि फळांचे वाटप करण्यात आले.
येथील ग्रामस्थ मालती वारे यांनी मान्यवरांचे स्वागत केले तर कोकण संस्थेच्या तारा सांगळे यांनी आभार मानले. यावेळी संस्थेचे सुरज कदम आणि युवा किरणचे युवा दिनेश शिद सह शेकडो महिला आणि विद्यार्थी उपस्थित होते.