निवडणूक अधिकारी आर.जे.पवार यांची माहिती
कणकवली / उमेश परब – कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत पोटनिवडणुकिसाठी मतदान उद्या दि.२१ डिसेंबरला होणार आहे.कळसुली,हळवल,लोरे नंबर १ या गावातील प्रत्येकी १ प्रभागासाठी मतदान होणार असून निवडणूक केंद्राध्यक्षांसह सर्व कर्मचारी ईव्हीएम मशीन व साहित्य घेऊन आज रवाना झाले आहेत, अशी माहिती कणकवली तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी आर.जे.पवार यांनी दिली.कळसुली गावातील जिल्हा परिषद शाळा हुंबरणे , हळवल केंद्र शाळा न.१,लोरे नंबर १ प्राथमिक शाळा नरामवाडी या मतदान केंद्रांवर ग्रामपंचायत पोट निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. या मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान अधिकारी, मतदान कर्मचारी, पोलीस व व्यवस्थापक म्हणून तलाठी व पोलीस पाटील उपस्थित राहणार आहेत. तसेच सदर केंद्रांवर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित राहतील.सदर मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी दुसऱ्या ईव्हीएम मशीनची व्यवस्था ठेवण्यात आलेले आहे.सर्व निवडणूक प्रक्रियेवर नियंत्रण झोनल ऑफिसर ठेवणार आहेत.सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत सदर प्रभागातील मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन आर.जे .पवार यांनी केले आहे.सर्व ईव्हीएम मशीनची रंगीत तालीम आज होईल . मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच तालुक्यातील ज्या ग्रामपंचायत पोटनिवडणुका इतर मागास प्रवर्ग आरक्षणाच्या होत्या , त्या १२ जागा सर्वसाधारण प्रवर्ग म्हणून निवडणुक अधिसूचना आज काढण्यात येणार आहे.त्याठिकाणी मतदान १८ जानेवारीला मतदान होईल. त्यानंतर निवडणुकांचे एकत्रित निकाल १९ जानेवारी २०२२ रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे आर.जे.पवार यांनी सांगितले.