मालवण | प्रतिनिधी : कोरोना पार्श्वभूमीवर गणेशोत्सव काळात नेमके काय निर्बंध असतील? बाहेरून जिल्ह्यात दाखल होणाऱ्यांसाठी काय नियमावली असेल? याबाबत गावागावात संभ्रम कायम आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लवकर गणेशोत्सवाबाबत सुधारीत आदेश जाहीर करावेत, अशी मागणी चौके सरपंच राजा गावडे यांनी केली आहे. तेरा ऑगस्ट रोजी नागपंचमी, त्यानंतर गोकुळ अष्टमी व गणेशोत्सव या पाठोपाठ येणाऱ्या सणांचा विचार करता येत्या चार दिवसात नियमावली बाबत जिल्हाधिकारी यांनी धोरण निश्चित केल्यास अधिक सर्वांच्या दृष्टीने अधिक सोयीस्कर ठरेल, असेही सरपंच राजा गावडे यांनी म्हटले आहे. प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात राजा गावडे म्हणाले, गेली दोन वर्षे कोरोना कालावधीत जनता त्रस्त आहे. सातत्याने असणारे निर्बंध यामुळे अनेकांचे उत्पनाचे स्रोत, नोकरी व्यवसाय यावर मोठा परिणाम झाला आहे. आता कोरोनाचा संसर्ग मुंबईसह राज्यात कमी झाला आहे. त्यात पुन्हा नव्याने तिसऱ्या लाटेचा इशारा दिला जात आहे. आगामी काळात कोकणातील सण, गणेशउत्सव यांचा विचार करता गावी येणारे मुंबईकर चाकरमानी व अन्य ठिकाणाहून येणाऱ्या व्यक्ती यांना काय नियमावली असेल ? कॉरंटाईन नियमावली असणार आहे की नाही ? ज्यांचे एक किंवा दोन्ही लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यांना काय शिथिलता असेल ? आरटीपीसीआर टेस्ट केलेली असेल तर काय ? यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी गणेश चतुर्थी कालावधीत काय नियमावली असेल याबाबत जिल्हा प्रशासनाने लवकरच धोरण निश्चित करावे. तसे केल्यास ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका यांना याबाबत नियोजन करणे सुलभ होईल. गावी येण्यासाठी चाकरमानी मंडळींकडून नियोजन सुरू आहे. ही सगळी आपलीच माणसे आहेत त्यांच्याकडून जिल्ह्यात काय नियम आहेत, याची विचारणा होत आहे. तरी या सर्व बाबींचा विचार करता जिल्हा प्रशासनाने गणेशोत्सव सुधारित नियमावली येणार असेल तर त्याबाबत लवकर निर्णय जाहीर करावा. लवकर नियमावली जाहीर झाल्यास स्थानिक व चाकरमानी या दोघानाही नियोजन करणे सोयीस्कर होईल. अशी मागणी वजा भूमिका चौके सरपंच राजा गावडे यांनी स्पष्ट केली आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -