मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : संविधाननिष्ठ राष्ट्रवाद भारताच्या कानाकोप-यात,वाड्यावस्त्यात मेंदूच्या आणि बाहुच्या बळावर विकसित होणे आवश्यक आहे. यासाठी भारतात संविधान संस्कृती निर्माण करणे बंधनकारक आहे. संविधान साक्षरता निर्माण झाली तरच लोकशाही बळकट होऊन संविधाननिष्ठ राष्ट्रवाद अधिक प्रबळ होईल असे प्रतिपादन नांदेड येथील ज्येष्ठ संविधान अभ्यासक आणि विचारवंत प्रा.डाॅ.अनंत राऊत यांनी केले. बुद्धविहार कणकवली येथे दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या संस्थेने आयोजित केलेल्या संविधाननिष्ठ राष्ट्रवाद या विषयावर जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. श्री.राऊत पुढे म्हणाले की, जोपर्यंत आपण आपल्या डोक्यातील जात नावाचा किडा नष्ट करण्यासाठी सिद्ध होत नाही, तोपर्यंत भारतात लोकशाहीधिष्ठित संविधाननिष्ठ राष्ट्रवादाची संकल्पना रूजू शकणार नाही. आज आपल्या देशात संविधान संस्कृती निर्माण करण्याची कधी नव्हे इतकी गरज निर्माण झाली आहे.कारण भारतीय संविधानाच्या पायावर जे राष्ट्र उभे आहे,तो पायाच उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र इथली तथाकथित शक्ती पद्धतशीरपणे काम करत आहे.म्हणुन आपणास आता खूप सावधपणे आणि सजगतेने पावले टाकत संविधानाला अभिप्रेत असलेले राष्ट्र बनविण्यासाठी संविधान साक्षरता वाढवून लोकशाही राष्ट्रवाद बळकट करण्यासाठी कटिबद्ध व्हावे लागेल असे प्रतिपादन श्री.राऊत यांनी केले.यावेळी विचारमंचावर दर्पण प्रबोधिनीचे अध्यक्ष राजेश कदम, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक व संशोधक प्रा.डॉ. सोमनाथ कदम उपस्थित होते. विचारमंचावरील मान्यवरांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष सन्मा.राजेश कदम यांनी केले.कार्यक्रमाच्या सुरूवातीला प्रा.डाॅ.अनंत राऊत यांचे हस्ते महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती. पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संविधान प्रास्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.दर्पण महिला फ्रंटच्या अध्यक्षा स्नेहल तांबे यांनी प्रास्ताविकेचे वाचन केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्पण प्रबोधनाचे माजी अध्यक्ष,कवी सिद्धार्थ तांबे यांनी केले .संस्थेचे कार्यवाह आनंद तांबे यांनी प्रास्ताविक केले आणि आभार संस्थेचे उपाध्यक्ष अनिल तांबे यांनी मानले. उपस्थितांचे स्वागत विशाल हडकर , महेंद्र कदम यांनी केले .या कार्यक्रमाला जिल्ह्यातील विविध सामाजिक, सांस्कृतिक संघटनांचे पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी दर्पण चे माजी अध्यक्ष सन्मा.किशोर कदम,संदेश कदम,राजा कदम,तसेच दर्पण कार्यकारिणी यांनी विशेष मेहनत घेतली.
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -