ऐश्वर्य मांजरेकर यांच्या रूपाने मालवण तालुक्याला प्रथमच हा मान झाला प्राप्त…!
मालवण | ब्युरो न्यूज : मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबईतर्फे आयोजित राज्यस्तरीय गुणीजन गौरव महापरिषद तर्फे कला, क्रीडा , सामाजिक , साहित्यिक आणि संशोधन आदी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तरुणांना व संस्थेला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो .
‘पुरस्कार प्रेरणा देतात आणि प्रेरणेने राष्ट्र मोठे होते’ असा उदात्त हेतू ठेवून लोकसेवा अकादमी दरवर्षी अशा स्वरूपाचे पुरस्कार प्रदान करते .यंदा सन 2021 यावर्षीचा राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्काराचे मानकरी म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्याचे सुपुत्र ऐश्वर्य वसुंधरा जनार्दन मांजरेकर यांची राज्यस्तरीय निवड करण्यात आली आहे .
ऐश्वर्य मांजरेकर यांच्या सामाजिक , शैक्षणिक व इतर क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई व गुणीजन गौरव महापरिषदेचे अध्यक्ष अॅड. कृष्णाजी जगदाळे यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली. सदर पुरस्कार सोहळे मुंबई, पुणे , नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहेत . पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मानचिन्ह , लक्षवेधी गौरवपत्र , विशेष महावस्त्र , खास मानपत्र , मानकरी बॅच व मानाचा फेटा असे असून समारंभाध्यक्ष पद्मश्री डॉ विजयकुमार शहा व नामवंत पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ऐश्वर्य वसुंधरा जनार्दन मांजरेकर यांना राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समाजरत्न पुरस्कार 2021 जाहीर केल्याबद्दल समाजातील विविध स्तरांसह समस्त सिंधुदुर्गवासीय व मालवणवासीयांतर्फे त्यांची विशेष प्रशंसा केली जात आहे .