आचरा | अनिकेत पांगे : “कोकणातील माणूस फणसासारखा असतो असे म्हणतात. वरून काटेरी आतून गोड.तोंडावर मिश्किलसे हलके फुलके भाष्य करुन समोरच्या व्यक्तीला विचार करायलाही लावेल पण त्याच्या गरजेला मदत म्हणून रात्री अपरात्री धावून स्वभावातला गोडवा दाखवून देईल. पण हल्ली या धकाधकीच्या जीवनात स्वभावासोबत रक्तातला गोडवा सुद्धा वाढलेला पाहायला मिळतो.म्हणजेच हल्ली मधुमेह हा आजार बळावल्याचे प्रमाण आपल्याला लोकांमध्ये वाढलेले पाहायला मिळते” याबाबत जागृती व उपचारांची माहिती या उद्देशाने डॉ. सिद्धेश सकपाळ व त्यांचे सहकारी त्रिंबक यांच्या प्रयत्नाने मोफत मधुमेह तपासणी मंगळवार दिनांक 30 नोव्हेंबर 2021 त्यांच्याच दवाखान्यात आयोजित करण्यात आले आहे.तपासणी व त्यावर उपचार तसेच प्रतिबंधक मार्गदर्शन हा या शिबिराचा मूळ हेतू आहे.
त्याशिवाय हातापायातील सुन्नपणा, जळजळ हा आजार सध्या वरचे वर दिसून येतो. पायामध्ये रक्ताभिसरण व्यवस्थित होतेय की नाही हे पडताळून पाहण्यासाठीसुद्धा काही मशीनद्वारे मोफत चाचणी करण्यात येणार आहे.
मधुमेह तपासण्यासाठी येणाऱ्या रुग्णांनी कृपया उपाशीपोटी यावे जेणेकरून आपणास व्यवस्थित चाचणी करता येईल आणि जास्तीत जास्त लोकांनी या मोफत तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे डाॅक्टर सिद्धेश सकपाळ व सहकाऱ्यांकडून आवाहन करण्यात आले आहे.