मालवण | सुयोग पंडित : गेल्याच महिन्यात मसुरे येथील कुमारी वैभवी पेडणेकर हिने तिच्या महिनाखर्च तथा पाॅकेटमनीतून तिच्या प्राथमिक शाळेत जात साजरा केलेला वाढदिवस एक “वैभवशाली बालपण” कसे मिळवावे याचा पाठ सर्वांना देऊन गेलेला होताच .कुडाळ महाविद्यालयातील या विद्यार्थिनीला आता आणखी एका क्षेत्रात सहभागी होताना पाहून तिच्यातील अष्टपैलुत्वाचीही चुणूक आता दिसलेली आहे.
बॅरिस्टर नाथ पै सेवांगण या सुप्रसिद्ध सामाजीक संस्थेतर्फे खुल्या व राज्यस्तरीय ऑनलाईन दशावतार स्पर्धेचे आयोजन केले गेले होते. वैभवी पेडणेकर हिने या स्पर्धेत कोळी हे विनोदी पुरुषपात्र साकारले होते.
या राज्यस्तरीय स्पर्धेत तिच्या भूमिकेला सर्वांनीच उत्तम पसंद केले होते.
तज्ञ परिक्षकांनाही तिची भूमिका पाहून तिला राज्यस्तरीय स्पर्धेत उत्तेजनार्थ क्रमांक घोषित केला आहे. दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी तिला त्याविषयीचे उत्तेजनार्थ क्रमांक प्रशस्तीपत्र वितरीत झाले आहे.
अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेतील नवोदीत वैभवी पेडणेकर हिचे यश नक्कीच मसुरेवासियांना आणि कुडाळ महाविद्यालयालाही आनंद देणारे ठरले आहे . वैभवीच्या या यशाबद्दल वैभवीसोबत तिचे शिक्षक,प्राध्यापक, पालक तथा मसुरेतील झुंजार व दत्तप्रसाद पेडणेकर या समाजशील कुटुंबियांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. श्री.दत्तप्रसाद पेडणेकर हे वैभवीचे वडिल असून त्यांचा सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमातील सहभाग हा वैभवीला उत्तम प्रेणादायक ठरला आहे.