मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे यांनी मालवण आडवण येथील परप्रांतीय भंगार व्यवसायिकांची अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी पत्र दिले. त्यानंतर प्रशासनाने पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने ती जमीनदोस्त केली. याला नागरिकांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत कारवाईचे स्वागत केले आहे.
मालवण नगरपरिषद हद्दीतील वायरी आडवण येथे काही परप्रांतीय भंगार व्यवसायिक यांनी अनधिकृतपणे अतिक्रमण करत बांधकाम केले असून येथे अनेक गैरप्रकार सुरु आहेत, तरी सदरील अनधिकृत बांधकाम हटवत परिसर मोकळा करावा असे निवेदन पत्र आमदार निलेश राणे यांच्या वतीने नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनास दिले होते. त्यानुसार तात्काळ कारवाई झाली आहे.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, भाऊ सामंत, आनंद शिरवलकर, दीपक पाटकर, आप्पा लुडबे, राजन वराडकर, महेश सारंग, राकेश सावंत, ललित चव्हाण, निषय पालेकर, उमेश मांजरेकर यांसह शेकडो नागरिक उपस्थित होते.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने रविवारी पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर देशभरात जल्लोष सुरु असताना मालवण शहरात आडवण परिसरात मात्र परप्रांतीय भंगार व्यासायिकाकडून भारत विरोधी घोषणा दिल्याचा प्रकार घडला. याबाबत हिंदू समाज संतप्त बनला आहे. दत्ता सामंत म्हणाले अशा प्रकारे जर कोणी देशद्रोही भुमिका घेत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही. आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे, खा. नारायण राणे यांसह महायुती नेते यांच्या नेतृत्वात आक्रमक भुमिका घेऊ, अशी अनधिकृत सर्व बांधकामे तात्काळ हटवा अशी भुमिका राहणार असल्याचे दत्ता सामंत म्हणाले. तसेच देशविरोधी भुमिका घेणाऱ्या विरोधात कठोर कारवाई झालीच पाहिजे असेही सामंत म्हणाले.