ठाणे | विशेष :आज भारताला टोकियो ऑलिंपिक्समध्ये हॉकीमध्ये कांस्यपदक मिळाले.
देशभर जल्लोषाचे वातावरण आहे.
या यशामध्ये सिंहाचा वाटा आहे भारतीय गोलकीपर श्रीजेश याचा.
या स्पर्धेत अप्रतिम बचावाचे प्रदर्शन करताना मजबूत इराद्याने आणि अभूतपूर्व कौशल्याने भिंतीसारखा गोलपोस्टसमोर श्रीजेश उभा राहिला. तो गेली 15 वर्षे सिनियर भारतीय हॉकी संघाला सेवा देतोय.
गेली 10 वर्षे तो भारतीय हॉकी संघाचा नियमित गोलकीपर म्हणून उत्तम कामगिरी बजावतोय. 2011च्या एशियन चॅम्पियन्स ट्रॉफमध्ये अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध दोन पेनल्टी स्ट्रोक्स अडवून संघाला मिळवून दिलेला विजय असो की 2014 एशियाड मध्ये अंतिम सामन्यात पुन्हां पाकिस्तानविरुद्ध दोन पेनल्टी स्ट्रोक्स अडवून संघाला मिळवून दिलेला विजय असो, श्रीजेशची कामगिरी नेहमीच उल्लेखनीय राहिली आहे.2016 मधील रिओ ऑलिंपिक्स मध्ये भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व करताना श्रीजेश भारताला उपउपांत्य फेरीपर्यंत घेऊन गेला होता. भारत सरकारने श्रीजेश यांना अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. एक भारतीय नागरिक म्हणून भारतीय हॉकी संघाच्या यशाने आपण खूप आनंदीत आहोतच…आणि अभिमानी सुद्धा !
( लेखक )विक्रांत गोपीचंद चव्हाण ,ठाणे.