संस्था अध्यक्ष श्री अजयराज वराडकर यांची उपस्थिती व कुडाळ हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक श्री. अनंत जामसंडेकर यांचे मार्गदर्शन.
राष्ट्रीय गणित दिवसाचे औचित्य.
मालवण | प्रतिनिधी : राष्ट्रीय गणित दिनाचे औचित्य साधून कट्टा येथील वराडकर हायस्कुलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कुडाळ हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक श्री. अनंत जामसंडेकर यांनी विद्यार्थ्यांना गणित विषयावर मार्गदर्शन केले. प्रशालेच्या दहावीच्या वर्गातील तसेच इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन सत्रात उत्स्फूर्त व सक्रिय सहभाग घेतला.
प्रारंभी थोर गणित तज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रीनिवास रामानुजन यांचे कार्य उलगडण्यात आले. तर प्रमुख पाहुणे कुडाळ हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक श्री. अनंत जामसंडेकर यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना गणितातील मूलभूत संकल्पना स्पष्ट केल्या तसेच परीक्षेत उत्तम गुण कसे मिळवावेत याबाबत उपयुक्त माहिती दिली. जामसंडेकर यांचे सहज आणि प्रभावी शिकवण्याचे तंत्र विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरले. यावेळी कट्टा हायस्कूलचे गणित विभागप्रमुख प्रकाश कानूरकर यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यास नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. त्यांनी गणिताचे अवघड वाटणारे सूत्र आणि उपपत्ती सोप्या पद्धतीने समजावून सांगितल्या. याशिवाय परीक्षेतील वेळेचे व्यवस्थापन, नियमित सरावाचे महत्त्व यावर त्यांनी भर दिला.
दहावीच्या वर्गातील तसेच इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शन सत्रात सक्रिय सहभाग घेऊन गणिताशी संबंधित अनेक प्रश्न विचारले, ज्यावर तज्ज्ञांनी सविस्तर उत्तरे दिली. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून विषयाविषयीची आवड अधिक बळकट झाली. कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. अजयराज वराडकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तर मुख्याध्यापिका सौ. देवयानी गावडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले व आभार मानले.