मालवण तालुका हौशी क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन आयोजीत स्पर्धा.
उद्घाटक तथा प्रतिथयश माजी क्रिकेटपटू डाॅ शिरीष कदम यांच्या सह जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष अनिल हळदिवे, तालुका हौशी क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष रीझवान शेख़ व पदाधिकारी, खेळाडू यांची उपस्थिती.
मालवण | प्रतिनिधी : या लेदरबाॅल क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून कोकणातील छोट्या क्रिकेट पटूंना मोठे क्रिकेट पटू बनवण्याचे कार्य आपण घडवत आहोत. कोकणच्या भूमीत प्रचंड गुणवत्ता आहे. आईच्या पोटातून जन्माला आलेल्या प्रतिभेला तराशणे व त्याला संधी देणे यासाठी हा उपक्रम आहे. ७५ लाख लोकसंख्या असलेल्या एकूण कोकणाचा एक रणजी संघ तयार करणे हे आपले ध्येय आहे असे, मुंबई व कोकणातील अनेक स्पर्धा गाजवलेले माजी प्रतिथयश सुप्रसिद्ध क्रिकेटपटू तथा लेदरबाॅल क्रिकेटचे संघटक व समुपदेशक रेडिऑलाॅजिस्ट डाॅ शिरीष कदम यांनी मालवणच्या टोपीवाला हायस्कूल बोर्डिंग ग्राउंड मेदानावर आयोजीत १६ वर्षांखालील स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी आवाहन केले. १४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत चालणार्या या स्पर्धेचे आयोजन मालवण तालुका हौशी क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन यांनी केले आहे. यावेळी उद्घाटक डाॅ शिरीष कदम यांच्या सह जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष अनिल हळदिवे, तालुका हौशी क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष रीझवान शेख़ तसेच पदाधिकारी आंणि खेळाडू यांची उपस्थिती होती. बोर्डिंग ग्राउंडवरील मुख्य टर्फ खेळपट्टीवर श्रीफळ वाढवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष अनिल हळदिवे म्हणाले कोकण हा क्रिकेटदृष्ट्या मागास असून आम्ही आपल्या परीने क्रिकेट जगवण्यासाठी इथे प्रयत्न केले हे मुलांनी लक्षात ठेवून गांभीर्याने क्रिकेटकडे पाहिले पाहिजे.
स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या आरंभी, मालवण तालुका हौशी क्रिकेट असोसिएशन सल्लागार माजी नगरसेवक नितीन वाळके यांनी उपस्थित मान्यवर, पदाधिकारी, सदस्य व खेळाडूंचे स्वागत केले. उद्घाटक डाॅ शिरीष कदम, जिल्हा अध्यक्ष अनिल हळदिवे, तालुकाध्यक्ष रीझवान शेख़ यांच्या सह मंचावरील मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. मालवण तालुका हौशी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने उपस्थित सर्व पदाधिकारी व योगदान दिलेल्या व्यक्तिंचे तसेच स्पर्धा पंचांचे गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
या उद्घाटन कार्यक्रमाला डाॅ शिरीष कदम, अनिल हळदिवे, रीझवान शेख़, बबन रेडकर, बाबली वायंगणकर, सत्यवान राणे, उमेश मांजरेकर, नीळकंठ मालणकर, नितीन वाळके, वासुदेव वरावडेकर, जहीरशेख, रघू धारणकर, सिद्धू जाधव, आप्पा मालंडकर, संदीप पेडणेकर, सुधीर साटम, उदय रुमडे, विजय जोईल, चंद्रहास टेमकर, दीपक धुरी, सुनील शिंदे, नारायण धुरी, गोविंद ( बंटी) केरकर, हेमेंद्र मेस्त, अण्णा कारेकर, शाम वाक्कर, अमित काजरेकर, भूषण म्हापणकर, मनोज मयेकर, डॅनी फर्नांडिस, तसेच सिंधुदुर्ग जिल्हा होशी क्रिकेट असोसिएशन व मालवण तालुका हौशी क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य तसेच गुडमाॅर्निंग क्रिकेट संघाचे सदस्य, लेदरबाॅल क्रिकेट स्पर्धेतील सहभागी खेळाडू, प्रशिक्षक, पंच आणि मालवणच्या नागरीकांची उपस्थिती होती. प्रत्येक संघातील उत्कृष्ट खेळाडूला प्रशिक्षक दत्ता मिठबावकर यांच्या वतीने क्रिकेट कीटचे बक्षीस दिले जाणार आहे.
यावेळी मालवणच्या ज्येष्ठ क्रिकेटपटूंच्या योगदानाचा तसेच मालवण टोपीवाला हायस्कूल बोर्डिंग ग्राउंडवरील टर्फ खेळपट्टी बनवण्यासाठी झटलेल्या माजी क्रिकेटपटू जयंत गवंडे व सर्वांचा शब्दसुमनांनी विशेष गौरव करण्यात आला.
कोकणचा रणजी संघ बनविण्याच्या दृष्टीने, येत्या पाच वर्षात २०० लेदरबाॅल क्रिकेट पटू घडवण्यासाठीच्या उद्दिष्टा अंतर्गत अशा स्पर्धांचे आयोजन व लेदरबाॅल क्रिकेटची संस्कृती पुनरुज्जीवीत करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व क्रिकेट खेळाडूंनी एकत्र येऊन त्यांचा सहभाग द्यावा असे आवाहन यावेळी उद्घाटक डाॅ शिरीष कदम यांनी केले व त्याला उपस्थित सर्वांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक तथा मालवण तालुका हौशी क्रिकेट असोसिएशन सल्लागार माजी नगरसेवक नितीन वाळके यांनी आभार प्रदर्शन केले.
स्पर्धेतील दोन गटात एकूण चार अशाप्रकारे एकूण आठ संघांचा सहभाग असून स्पर्धा ३१ डिसेंबर पर्यंत चालणार आहे. स्पर्धेचे साखळी फेरीचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे. ( टीप : वेळापत्रकात ऐनवेळी अपरिहार्य कारणाने बदल शक्य असू शकतो.)