मालवण | प्रतिनिधी : मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने दरवर्षी अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. यंदा १९ व्या आंतर महाविद्यालयीन आविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन दिनांक १४ डिसेंबर रोजी मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग आणि स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. या स्पर्धेत झोन क्रमांक ९ म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये सहभाग घेणार आहेत. या अंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये जवळपास ७० संशोधन प्रकल्प सादर केले जाणार आहेत. हे सर्व प्रकल्प Humanities, Languages and Fine Arts, Commerce, Management and Law, Pure science, Agriculture and Animal Husbandary, engineering and technology, medicine and pharmacy अशा पाच वर्गवारी मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.
या स्पर्धेत पोस्टर राऊंड आणि पोडियम राऊंड अशा दोन फेऱ्या होणार आहेत. या विभागीय स्पर्धेमधून निवडले जाणारे स्पर्धक मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीमध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. अविष्कार स्पर्धेचे उद्घाटन १४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता महाविद्यालयातील नरहरी प्रभू झांट्ये सभागृहात संपन्न होणार आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाचे संचालक सन्माननीय डॉक्टर सुनील पाटील तसेच आविष्कारच्या ओ. एस. डी. डॉक्टर मीनाक्षी गुरव आणि संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब पंतवालावलकर यांच्या हस्ते, आणि सचिव श्री चंद्रशेखर कुशे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ॲड. समीर गवाणकर , प्राचार्य डॉक्टर शिवराम ठाकूर, जिल्हा समन्वयक डॉक्टर ज्ञानेश्वर शिरसट, उपसमन्वयक डॉक्टर उमेश पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.