१४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पारंपारिक रित्या दत्त जन्म सोहळा..
१५ डिसेंबर रोजी सायंकाळी अक्कलकोट शहरातून स्वामी समर्थांचा पारंपारीकरित्या पालखी सोहळा.
मसुरे | प्रतिनिधी : दत्त अवतारी श्री स्वामी समर्थांच्या मूळस्थानी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात सालाबादाप्रमाणे दत्त जयंती उत्सव १४ डिसेंबर रोजी साजरा करण्यात येत आहे. दत्त अवतारी श्री वटवृक्ष स्वामी समर्थांच्या वटवृक्ष मंदिरातील दत्त जयंती उत्सवास अनन्य साधारण असे महत्व असल्याची माहिती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली.
दत्त जयंती उत्सव शनिवार दिनांक १४/१२/२o२४ रोजी मंदिरात साजरा होत असून त्यानिमित्ताने व दिनांक १४/१२ ते दिनांक १५/१२/२०२४ अखेर दत्त जयंती उत्सव व सलग शासकीय सुट्टया यामुळे मंदिरात स्वामीच्या दर्शनाकरीता मोठया प्रमाणात गर्दी होणार आहे, त्यामुळे सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होण्यासाठी स्वामी भक्तांचे नित्यनियमाने होणारे अभिषेक वरील कालावधीत होणार नाहीत. जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील त्यांना खडीसाखर प्रसाद, स्वामींचा अंगारा प्रसाद मिळेल अशी माहिती पुरोहित मंदार महाराज पुजारी यांनी दिली. दत्त जयंतीचे औचित्य साधून सालाबादाप्रमाणे परगावाहून भांडुप, घाटकोपर – मुंबई, तळेहिप्परगा, भातंबरे, कोल्हापूर, सातारा, खर्डी, गांवखडी, येथून दिंडी व पालखी सोबत पायी चालत येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांची निवासाची व भोजन प्रसादाची सोय मैंदर्गी- गाणगापूर रस्त्यावरील देवस्थानच्या भक्त निवास येथे करण्यात आली आहे. वटवृक्ष मंदिरातील ज्योतिबा मंडपात दत्तजयंती दिवशी येथील सत्संग महिला भजनी मंडळाच्या वतीने देवस्थानच्या विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली दुपारी ४ ते ५ :३० या वेळेत दत्त जन्म आख्यान, वाचन व भजन करुन सायंकाळी ६ वाजता अनेक स्वामी भक्तांच्या उपस्थितीत गुलाल पुष्प वाहून श्री दत्त जन्म सोहळा व पाळणा कार्यक्रम संपन्न होईल.
रविवार दिनांक १५/१२/२०२४ रोजी दुपारी ११:३० च्या नैवेद्य आरतीनंतर मंदिर परिसरात प्रसाद वाटप करण्यात येईल. देवस्थानच्या मैंदर्गी- गाणगापूर रोडवरील भक्त निवास भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद दुपारी १२ ते ३ या वेळेत देण्यात येणार आहे. सायंकाळी ५ ते रात्री ९:३० या वेळेत शहरातून श्रींचा पालखी सोहळा मिरवणुक भजन, दिंडया व वाद्यांसह पार पडणार आहे. पालखी मार्ग वटवृक्ष मंदिरातून फत्तेसिंह चौक, मेन रोड, कापड बाजार, कारंजा चौक, बुधवार पेठ मार्गे समाधी मठ, समाधी मठात भजन सोहळा संपन्न होऊन समाधी मठ, बुधवार पेठ मार्गे कारंजा चौक, दक्षिण पोलीस ठाण्यासमोरून मौलाली गल्ली, गुरु मंदिर मार्गे सुभाष गल्ली, भारत गल्ली, देशमुख गल्ली मार्गे वटवृक्ष मंदिर असं असेल.
श्रींची पालखी मिरवणूक रात्री ९ : ३० वाजता मंदिरात आल्यानंतर देवस्थानच्या वतीने शिरा प्रसाद वाटप होवून श्री दत्त जयंती उत्सवाचा सांगता समारंभ होईल.
जास्तीत जास्त भाविकांनी दत्त जन्म सोहळा, पालखी सोहळ्यास उपस्थित राहुन श्रींच्या दर्शनाचा, पालखी सोहळा दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे. याप्रसंगी प्रथमेश इंगळे, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, श्रीशैल गवंडी, संजय पवार, विपुल जाधव इत्यादी उपस्थित होते.