सावंतवाडी | प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील न्हावेलीचे उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे आंदोलनाचा इशारा दिला आहे. सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा सक्षम नसल्यामुळे अनेक अपघातातील अनेक युवकांना जीव गमवावा लागत आहेत. या रुग्णालयात आरोग्य सेवा उपलब्ध नसल्यामुळेच न्हावेली येथील आपले बंधू भूषण उदय पार्सेकर या युवकाचा मृत्यू झाला असा आरोप न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी केला आहे. तर यापुढे गावासह तालुक्यातील युवकांच्या साथीने आरोग्याचा प्रश्न सुटण्यासाठी आंदोलन करू असाही इशारा त्यांनी दिला आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे त्यात असे म्हटले आहे की सावंतवाडीत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल होणार अशी वारंवार घोषणा केली जात आहे मात्र या ठिकाणी असलेले उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातच आरोग्याच्या सुविधा सक्षम नसल्यामुळे अनेक रुग्णांना जीव गमवावा लागत आहे. याचा परिणाम अनेक कुटुंबावर होत आहे. नुकतेच न्हावेली येथील आपले बंधू भूषण पार्सेकर युवकाचे अपघातात निधन झाले. या प्रकारचे आपल्या सिंधुदुर्गातील अनेक तरुण योग्य वेळी योग्य उपचार सोयी नसल्याने मृत्यूच्या दारात ओडले जातात त्यांना गोवा बांबोळी ठिकाणी न्यावे लागते. तो पर्यंत खूप विलंब होतो याला सुद्धा कारणीभूत येथील कमकुवत आरोग्य सेवाच आहेत असा आरोप अक्षय पार्सेकर यांनी केला आहे. उपचार करण्यासाठी विलंब झाल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला त्यामुळे यापुढे तरी लोकप्रतिनिधींनी आरोग्याच्या प्रश्नावर काम करणे गरजेचे आहे अन्यथा या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल आणि याला जबाबदार प्रशासन राहील असाही इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.