साळशीत बीएसएनएल सेवेत वारंवार बिघाड ; विद्यार्थी व ग्रामस्थांचे नेटपॅक वाया.
शिरगांव | संतोष साळसकर : देवगड तालुक्यातील साळशी गावामध्ये बीएसएनएल व्यतिरिक्त जनसंपर्कसाठी दुसरी कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने या ठिकाणी या दूरसंचारच्या टॉवरमध्ये वारंवार होणारा बिघाड ग्राहकांना त्रासदायक व गैरसोयीचे ठरत आहे. साळशी येथील गेले दोन दिवस टॉवरचे नादुरुस्त झालेली व्यवस्था दुरुस्त करण्यास दूरसंचार विभागाला अपयश आलेले आहे. त्यामुळे ग्राहक वर्गातून संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
या ठिकाणी मंदिरानजीक असलेल्या मोबाईल टॉवरची पाहणी केली असता तो अस्वच्छ व असुरक्षित स्थितीत आहे. हा टॉवर गेली ८ वर्ष अस्वच्छतेमुळे पावसाळ्यात झाडी वेली यांनी वेढलेला असून या ठिकाणी दुरुस्तीचे काम रात्री अपरात्री करणे धोकादायक झाले आहे. तसेच विद्युत वाहिन्यांचीही व्यवस्था ठीक दिसत नाही. दूरध्वनी ग्राहकांनी आपल्या गरजेसाठी नेट पॅक तसेच अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना निरोपयोगी ठरत आहे. ग्राहकांचे आर्थिक नुकसान होत असून वेळोवेळी याबाबत दूरसंचार विभागाकडे लेखी निवेदने देऊन देखील त्याचा काहीच परिणाम झालेला दिसत नाही.
गेल्या दोन दिवसात बंद पडलेल्या टॉवरमुळे रेशनिंग वाटप धान्य दुकान मध्ये लाभार्थींना रिकाम्या हाताने परत जावे लागले यामुळे दूरसंचारच्या या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे आणि गांवात बीएसएनएलचा टाॅवर आहे पण त्या पाॅवर नाही अशी खंत व्यक्त केली जात आहे.