मातृत्व आधार फाऊंडेशनचे संस्थापक संतोष लुडबे यांचे मातृत्व आधार फाऊंडेशनच्या वतीने दप्तर वाटप कार्यक्रम प्रसंगी मनोगत.
मालवण | प्रतिनिधी : गेली पाच वर्षे मालवणच्या मातृत्व आधार फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध सेवाभावी उपक्रम राबविले जात आहेत. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणार्या या संस्थेच्या वतीने भंडारी एज्युकेशन सोसायटी हायस्कूल, मालवण येथे दप्तर वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी बोलताना मातृत्व आधार फाऊंडेशचे संस्थापक श्री संतोष लुडबे म्हणाले की पाच वर्षांपूर्वी समाजहिताच्या दृष्टिकोनातून मालवणात स्थापन झालेल्या मातृत्व आधार फाउंडेशनने निरपेक्ष बुद्धीने सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक उपक्रम राबवितानाच गोरगरीब, दिन दलितांचे अश्रू पुसण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला. शिक्षण क्षेत्रात तर गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबविले. यापुढेही सामाजिक जाणीवेतून मातृत्व आधार फाउंडेशन अशाच पद्धतीने उपक्रम राबवत रहाणार आहे.
त्यावेळी व्यासपीठावर मातृत्व आधार फाउंडेशनचे अध्यक्ष महेश कांदळगावकर, बिर्ला कंपनीचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक रमाकांत पाटकर, सौ. सुहासिनी पाटकर, मुख्याध्यापक एच. बी. तिवले, मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक सदस्य संचालक हरीश उर्फ दादा वेंगुर्लेकर, सोनाली पाटकर, टोपीवाला हायस्कूलच्या प्रा. ज्योती तोरसकर, ऋत्विक सामंत, किसन मांजरेकर, पर्यवेक्षक आर डी. बनसोडे आदी उपस्थित होते.
प्रारंभी मुख्याध्यापक श्री. तिवले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी रमाकांत पाटकर यांच्या आर्थिक योगदानातून विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. यावेळी मातृत्व आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष महेश कांदळगांवकर, दादावेंगुर्लेकर यांनी उपस्थितांना संबोधीत केले. आर. डी. बनसोडे यांनी आभार प्रदर्शन केले.