शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पत्रकार परीषदेत माहिती.
मालवण | प्रतिनिधी : शिवसेनेची मुलुखमैदान तोफ अशी ओळख असलेले आणि शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे मालवणात ६ ऑक्टोबर रोजी व्याख्यान संपन्न होणार आहे. शहरातील राजकोट किल्ला येथील शिवपुतळा कोसळण्याच्या प्रकरणात ज्यांचा सहभाग आहे, त्यांची नांवे समोर येवून त्यांना कठोरात कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत एक शिवप्रेमी नागरिक आणि शिवसैनिक म्हणून आम्ही हा विषय लावून धरणार आहोत. यासाठी ज्या ज्या वेळी आवश्यकता भासेल त्या त्या वेळी आम्ही लढण्यासाठी सज्ज असणार आहोत. याच विषयासाठी दिशादर्शक मार्गदर्शन करून पुढील दिशा ठरविण्यासाठी शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील हे ६ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजता बंदरजेटी याठिकाणी जाहीर सभेसाठी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी शिवप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन ज्येष्ठ शिवसैनिक नितीन वाळके यांनी पत्रकार परिषदेत केले.
मालवणच्य शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, शहरप्रमुख पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी, युवा सेना प्रमुख समन्वयक मंदार ओरसकर, उपशहप्रमुख बंड्या सरमळकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवव्याख्याने पाटील यांचे शिवसेनेच्या वतीने कुंभारमाठ याठिकाणी भव्य स्वागत करण्यात येणार आहे. त्याठिकाणी शिवपुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर दुचाकी रॅलीने बंदरजेटी याठिकाणी त्यांचे आगमन होणार आहे. शिवप्रेमींच्या उत्स्फूर्त गर्दीमध्ये त्यांचे विचार ऐकण्यात येणार आहेत. शिवपुतळा दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर पाटील हे मालवणमध्ये येण्याचे निश्चीत झाले होते. त्यानुसार त्यांचा दौरा ६ ऑक्टोबरला निश्चित झाला असल्याचे वाळके यांनी सांगितले. शिवपुतळा दुर्घटनेतील दोषींवर कारवाई होण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या शिवसन्मान यात्रेतून निषेध मोर्चा, जाहीर सभा असे कार्यक्रम घेण्यात आले आहेत. आता शिवव्याख्याते पाटील यांचे मार्गदर्शन झाल्यानंतर पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. पाटील यांनी शंभुराजे या महानाट्याची निर्मिती केली आहे. त्यांनी रौद्र ही शंभुराजेंवर कादंबरी लिहिली आहे. यशाचा पासवर्ड यासारखी पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही लढण्यासाठी सज्ज राहणार आहोत, असेही माजी नगरसेवक व ज्येष्ठ शिवसैनिक नितीन वाळके यांनी स्पष्ट केले.