हरिनाम सप्ताहाची काकड आरतीने सांगता ; पौराणिक देखावे ठरले आकर्षण.
शिरगांव | संतोष साळसकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या साळशी येथील इनामदार श्री देवी पावणाई देवी मंदिरात हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न झाला. पंढरीच्या विठ्ठवाची भक्तीगीते, टाळ – मृदुंगाच्या व विठ्ठल नामाच्या गजराने साळशी गाव दुमदुमून गेला.
या हरिनाम सप्ताहात सातव्या रात्री साळशी येथील श्री संत सिध्देश्वर पावणाई प्रासादिक भजन मंडळाने डोल ताशांच्या गजरात व फाटाक्यांची आतषबाजीत व विठूनामाच्या जयघोषात काढलेला ‘अंधकासुर वध ‘ हा पौराणिक चित्र देखावा सर्वाचे आकर्षण ठरुन उपस्थितांची मने जिंकली. इनामदार श्री पावणाई देवी देवालयात २२ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. यानिमित्ताने इनामदार श्री पावणाई देवी देवालयास आकर्षक विद्युत रोषणाई व मंदिर सजावट करण्यात आली होती. या हरिनाम सप्ताहाच्या उत्सव काळात शिरगाव, वरेरी, चाफेड गावठण व राणे वाडी, बुधवळे, ओंबळ – काजरवाडी, भालचंद्र मठ -कणकवली, निरोम, शिवडाव, रेंबवली, कोळोशी, बांदिवडे, फोंडाघाट, वेंगुर्ले, चाफेड – भोगलेवाडी, बापर्डे – नाईक धुरेवाडी, कुवळे – आगरवाडी, खुडी, तोरसोळे, आरे, किंजवडे, आयनल आदी गावातून २७ भजनी दिंड्या सहभागी झाल्या होत्या. तसेच साळशी गावकरवाडी,देवणेवाडी व घाडीवाडी अंगणवाडीतील मुलांच्या सहभागाने हरिनामाची रंगत आणखीनच वाढली.
या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सातव्या रात्री साळशी येथील श्री संत सिध्देश्वर पावणाई प्रासादिक भजन मंडळाने रंगीत दिंडी काढून ‘अंधकासुर वध’ हा पौराणिक चित्र देखावा सादर करून उपस्थितांची मने जिंकली.यामध्ये विनायकी- शैलीप साळसकर, शंकर- अमेय माळवदे,पार्वती – प्रज्ञा घाडी,अंधकासुर – संतोष नारिंग्रेकर यांनी भुमिका साकारल्या होत्या. तसेच दिंडीत प्रविण नाडणकर, हिरोजी नाईक,प्रकाश किजवडेकर, तेजस नाडणकर, श्रेयस नाडणकर, सुहास कोदे,राजेंद्र घाडी, श्रवण गावकर यानीही आकर्षक वेशभुषा सादर केली होती. हा पौराणिक चित्र देखावा पाहण्यासाठी दशक्रोशीतील रसिकांनी मोठी गर्दी केली होती.तसेच माहेरवाशीनींची आवर्जुन उपस्थिती होती. या हरिनाम सप्ताहाची सांगता २९ सप्टेंबरला पहाटे काकड आरतीने झाली. या हरीनाम सप्ताहात सहभागी मंडळांच्या महाप्रसाद व अल्पोपहाराची विशेष सोय करण्यात आली होती.
या हरिनाम सप्ताहाच्या कालावधीत सहभागी झालेल्या सर्व भजनमंडळींचे श्री देव सिध्देश्वर पावणाई इनामदार देवस्थान ट्रस्ट, बारा – पाच मानकरी व साळशी ग्रामस्थ यांनी आभार मानले.