मसुरे | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती देवालयातील सार्वजनिक श्री. गणेशोत्सवाची सांगता शुक्रवारी सायंकाळी विसर्जन मिरवणुकीने झाली. गेले २१ दिवस देवालयातील श्री सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी विधिवत पूजन झाल्यानंतर देवस्थान ट्रस्ट पदाधिकारी, गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. बौद्धवाडी, सावंतवाडी, लब्देवाडी, भंडारवाडी तिठा, आडवळवाडी अशा मार्गाने मुणगे समुद्रकिनारी विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली.
विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावरील प्रत्येक वाडीत गणरायांवर पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी ग्रामस्थांना अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मुणगे समुद्रकिनारी ‘मुणगे गांवचा राजा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाप्पाना निरोप देण्यासाठी असंख्य गणेशभक्त उपस्थित होते.