मसुरे | प्रतिनिधी : देवगड तालुक्यातल्या मुणगे येथील श्री भगवती देवालय येथे देवगड तालुका मर्यादित भजन स्पर्धेत श्री पावणाई प्रासादिक भजन मंडळ कुणकेश्वर (बुवा रविकांत घाडी ) मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. श्री भगवती देवस्थान आयोजित एकवीस दिवसांच्या गणेशोत्सवानिमित सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन देवस्थानचे अध्यक्ष ओंकार पाध्ये, उपाध्यक्ष दिलीप महाजन यांनी केले. यावेळी देवस्थानचे सचिव निषाद परुळेकर, विश्वस्त कृष्णा उर्फ दादा सावंत, विजय मुणगेकर, प्रकाश सावंत, अनिल धुवाळी, आनंद घाडी, वसंत शेट्ये, पुरुषोतम तेली, मनोहर मुणगेकर, प्रसिद्ध भजनी बुवा राजेंद्र प्रभु, देवदत्त पुजारे, चंद्रकांत रामम, माजी सरपंच सुरेश बोरकर, सोसायटी अध्यक्ष गोविंद सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत द्वितीय क्रमांक श्री सिद्धीविनायक प्रासादिक भजन मंडळ बापर्डे (बुवा संदेश नाईकधुरे), तृतीय क्रमांक
श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ कातवण ( बुवा ओमकार जोईल ) तर उत्तेजनार्थ श्रीराम प्रासादिक भजन मंडळ जामसंडे – भटवाडी (बुवा आनंद लाड ) यांची निवड करण्यात आली. प्रथम तीन क्रमांकाना अनुक्रमे ७ हजार, ५ हजार, ३ हजार रुपये, उ्तेजनार्थ २ हजार रुपये व प्रत्येकी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सहभागी स्पर्धक श्री गुरुकृपा प्रासादिक भजन मंडळ आरे (बुवा हेमांग कदम) व श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ कातवण (बुवा सुशांत जोईल) यांना १००१, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले. परीक्षण संगीत विशारद माधव गावकर, सागर राठवड यांनी केले. सूत्रसंचालन व आभार भजनी बुवा देवदत्त उर्फ आबा पुजारे यांनी केले.