ज्येष्ठ पत्रकार श्री. ॠषी श्रीकांत देसाई वाढदिवस विशेष.
संपादकीय विशेष : पत्रकारीतेच्या माध्यमांची विविधता ही प्रसाराच्या व्यापकतेला पोषक ठरते. याच दरम्यान तंत्रज्ञान जरी बदलत राहीले तरी ‘लेखणी आणि वाणी’ हीच मूलभूत अस्त्रे असतात. पत्रकारीतेतील अस्त्रे ही सामाजिक आकार देताना शिकवणी सारखे परीणाम करत असतात. त्या ‘लेखणी आणि वाणी’ यांना स्वत्व न समजता सात्विक तत्व समजून पत्रकारीता सांभाळणे ही एक जबाबदारी असते. तंत्रांच्या बदलांच्या वास्तवाचे स्विकार करत न कुरकुरता, पत्रकारितेतील उपयुक्त ‘खुमासदारपणा’ नैसर्गिकरीत्या सांभाळणारे जे पत्रकार आहेत त्या मांदियाळीतील एक आश्वासक नांव म्हणजे ॠषी श्रीकांत देसाई.
पत्रकार ॠषी देसाई जेंव्हा वृत्त निवेदक म्हणून कार्यरत असतात तेंव्हा प्रेक्षक व श्रोते यांना वैखरी, मध्यमा, पश्यंती आणि परा या वाणीच्या चारही प्रकारांच्या बैठकीचा सोहळा अनुभवता येतो. त्यांचे लेखन देखिल वाचताना त्यांच्या वाणीची बैठक वाचकाच्या कानात अस्सल व ठाम रुंजी घालते हे त्यांचे विशेष लेखन वैशिष्ट्य आहे.
पत्रकारीता क्षेत्रात त्यांची दोन दशकांची तपश्चर्या ही नुसती पत्रकार म्हणूनच नाही तर साहित्यिक, औद्योगिक, क्रीडा, कला क्षेत्रातील होतकरुंसाठी प्रेरक ठरत असते. चंगळवादाच्या राक्षसाला वाचनरुपी देव नियंत्रीत करु शकतो असा त्यांचा सामाजिक भानाचा संदेश महाराष्ट्र व कोकणातील अनेक युवकांसाठी गेली २ दशके मार्गदर्शक ठरत आहे. कॅलेंडर आणि वेळ यांच्या सजगतेनेच आधुनिक दैनंदिन जीवन व सर्वांगीण आरोग्य सुखाचे कसे होते याबाबतही ते आग्रही असतात.
लेखणी आणि वाणी’ यांचा सडेतोड तरिही समतोल आणि सर्वांगीण सकारात्मकतेसाठी जागर करणारे ज्येष्ठ पत्रकार श्री. ऋषी श्रीकांत देसाई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
( सुयोग पंडित, मुख्य संपादक व स्थापक, आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल समूह. )