प्लॅटफॉर्मवर शेडचा अभाव, परतीच्या प्रवासावर वाईट प्रभाव .!
विशेष | नितीन गावडे (मळगांव ) : कोकण रेल्वे नेमकी आमच्यासाठी आहे का असे प्रश्न कोकणातील माणसांना नेहमी पडत असतात.सध्या त्यात आणखी एक मुद्दा ठळकपणे अधोरेखीत होत आहे. रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्म वर शेड नसल्याने चाकरमान्यांना परतीच्या प्रवासात पाऊसात भिजत उभे राहत ट्रेनची प्रतिक्षा करावी लागत आहे. गणेशोत्सवात काळात कोकणात गावी आलेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. यंदा मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी आले आहेत. दिड, पाच, सात, नऊ दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन करून चाकरमानी आता परत आपल्या नोकरी व्यवसाय, प्रपंचाच्या ठिकाणी जायला निघाले आहेत.
गणेशोत्सवात पाऊसाची रिमझीम सुरू असल्याने चाकरमान्यांना अडचणींचा सामना करत परतीचा प्रवास करावा लागत आहे आणि ती रिमझीम रिपरीप वाटू लागली आहे अशा प्रतिक्रिया आहेत.
सिंधुदुर्गातील रेल्वे स्थानकांवरील प्लॅटफॉर्मवर शेड नसल्याने भरपावसात चाकरमान्यांना भिजत उभे राहावे लागत आहे, असे चित्र बहुतांश रेल्वे स्थानकांवर दिसत आहे.
कोकणात पर्यटनास चालना देण्याकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण रेल्वे स्थानकाच्या पोहोच मार्गांचे देखभाल दुरुस्ती आणि परिसरातील सुशोभिकरणाचे काम करण्यात आले आहे. कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदुरे रेल्वेस्थानकापर्यंत एकूण ३७ रेल्वेस्थानके आहेत. त्यापैकी पर्यटनदृष्ट्या महत्वाच्या आणि प्रवाशांची सातत्याने वर्दळ असणाऱ्या १२ रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरणाचे काम पहिल्या टप्प्यात होत आहे. रेल्वे स्थानकांच्या पोहोच रस्त्याचे काँक्रीटकरण करणे, रस्त्याच्याकडेला प्रकाश दिवे लावणे, पेव्हड शोल्डर व आर.सी.सी. गटर्स बांधणे. महिला व पुरुष प्रवाशांकरिता स्वतंत्र स्वच्छतागृहाची बांधणी, प्रवाशांसाठी स्थानक परिसरात स्टेशन प्लाझा, प्रवाशांसाठी स्थानक परिसरात बस थांबे बांधणे, स्टेशन प्लाझा अंतर्गत प्रवाशांसाठी प्रतिक्षालयाची व्यवस्था करणे. ऊन पाऊसापासून संरक्षणासाठी कायम स्वरुपी व्यवस्था, येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवेश आणि बाहेर पडण्याकरीता प्रशस्त मार्ग, दुचाकी, चारचाकी, बस आणि रिक्षासाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे,
रायगड जिल्ह्यातील तीन रेल्वे स्थानके वीर, माणगाव आणि कोलाड, रत्नागिरी जिल्ह्यातील पाच रेल्वे स्थानके चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर आणि खेड. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार रेल्वे स्थानके कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ आणि सावंतवाडी. या कामांना राज्य शासनाने मंजूरी दिली आहे. मार्च २०२३ च्या अर्थसंकल्पामध्ये १२ कामांकरिता ५६.२५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामे सुरू करण्यात आली आहेत आणि काही रेल्वे स्थानकांचे बाहेरुन सुशोभीकरण पुर्ण होऊन मंत्री महोदयांच्या हस्ते उद्घाटन पूर्ण झाले आहेत.
मात्र रेल्वे स्थानकांच्या आतील परीस्थिती वेगळी आहे, आतमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर पञ्याची शेड नसल्याने रेल्वे प्रवाशांना ऊन, पाऊस याचा सामना सहन करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाश्यांनी संताप व नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत रेल्वे प्रवासी संघटना वेळोवेळी आवाज उठवत आहे.
रेल्वे स्टेशनचे खालच्या बाजुने सुशोभिकरण करताना रेल्वेकडून करार करुन जागा घेतली. तशीच रेल्वेकडून प्लॅटफॉर्म , निवारा शेड करण्याकरीता जागा मिळू शकते. त्याचा उपयोग खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनता, नागरिक, चाकरमानी यांना होईल.
चाकरमान्यांना कोकणातील पावसाची रिमझीम नेहमी आवडते किंबहुना ते अनुभवण्यासाठी ते आतुरही असतात परंतु परतीच्या प्रवासात जर प्लॅटफॉर्मवर छप्पर जर डोक्यावर नसेल तर ती रिमझीम रिपरीप वाटते आणि त्यांच्या संतापाचा उद्रेकही होऊ शकतो….!