मालवण |
मालवण तालुक्यातील पेंडूर बौद्धवाडी येथील रहदारीच्या रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तीबाबत प्रशासनाचे लक्ष वेधूनही त्या व्यक्तीवर कारवाई होत नसल्याने व येथील बौद्ध बांधवानी काल स्वातंत्र्यदिनी मालवण तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण छेडत कारवाईची मागणी लावून धरली. या उपोषणास आम. वैभव नाईक यांनीही भेट देऊन ग्रामस्थांचा प्रश्न जाणून घेत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र प्रशासनकडून ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेत रात्रभर उपोषणस्थळी ठाण मांडला. या उपोषणाला बौद्ध संघटनांनीही जोरदार पाठिंबा दर्शविला. अखेर ग्रामस्थ व संघटनांच्या आक्रमकपणामुळे मालवण पंचायत समिती प्रशासन व तहसीलदार यांनी पोलीस बंदोबस्तात अडविलेला रस्ता खुला केल्याने आज सायंकाळी हे उपोषण मागे घेण्यात आले.
मालवण तालुक्यातील पेंडूर नाका ते पेंडूर बौद्धवाडी मध्ये जाणारा रस्ता हा अनुसूचित जातीच्या लोकांसाठी दळणवळणाचा एकमेव अधिकृत मार्ग आहे. सदरच्या रस्त्यावर पेंडुर गावातील एका व्यक्तीने डिसेंबर २०२३ च्या कालावधीत आकसापोटी जेसीबी च्या सहाय्याने १५० मीटर अंतरापर्यंत मोठमोठे खड्डे मारून ठेवले तसेच सिमेंटचे पाईप टाकून दळणवळणाला अडथळा आणून ठेवला, यामुळे ये-जा करण्यासाठी अडचण निर्माण झाली असल्याची व्यथा स्थानिक बौद्ध बांधवांनी मांडत याबाबत प्रशासनकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने काल स्वातंत्र्यदिनी सकाळपासून मालवण तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केले.
या उपोषणात पेंडुर बौद्धवाडी येथील बहुसंख्य बौद्ध बांधव, वृद्ध व्यक्ती व आजारी व्यक्तीही सहभागी झाल्या होत्या. काल तहसीलदार वर्षा झाल्टे यांनी या उपोषण कर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच या प्रश्नी पंचायत समितीव गटविकास अधिकाऱ्यांकडूनही लक्ष दिले जात नसल्याने ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला. काल आमदार वैभव नाईक यांनीही उपोषणस्थळी भेट देत गटविकास अधिकारी आत्मज मोरे यांना धारेवर धरत याप्रश्नी योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. मात्र ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेत रात्रभर उपोषण सुरूच ठेवले. आज दिवसभरही हे उपोषण सुरूच राहिले. याबाबत बौद्ध संघटनांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला. ग्रामस्थांनी मागे हटण्यास नकार दिल्याने अखेर आज पोलीस बंदोबस्तात संबंधित रस्ता पंचायत समिती प्रशासन व तहसीलदार यांनी खुला केला. त्यामुळे आज सायंकाळी हे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी तहसीलदार वर्षा झालटे, गटविकास अधिकारी आत्मज मोरे, पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, ठाकरे शिवसेना शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, उपजिल्हाप्रमुख संदीप कदम, महेश परुळेकर, शिवगर्जनाचे रोहन कदम, सिध्दार्थ जाधव, संजय पेंडूरकर, विलास वळंजू, उत्तम पेंडूरकर, पांडुरंग पेंडूरकर, संतोष पेंडुरकर, हरीचंद्र पेंडूरकर उपस्थित होते.