भजन बचाव गुप्त मंडळाचे अध्यक्ष किशोर रासम
मसुरे | प्राजक्ता पेडणेकर : कोरोना नंतर गणेश चतुर्थीपासून भजनाला ख-या अर्थाने सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे सर्व भजनी कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी पुन्हा एकदा मिळाली आहे.तरी सर्व भजनी बुवांनी आणि कार्यक्रम आयोजकांनी व्यवस्थितपणे कार्यक्रम सादर कसा होईल याकडे लक्ष केंद्रित करावे.असे आवाहन भजन बचाव गुप्त मंडळाचे अध्यक्ष बुवा किशोर रासम यांनी केले आहे
गेल्या दोन वर्षांपासून डबल बारी कार्यक्रम कोरोनामुळे व्यवस्थित सादर करण्यात येत नव्हते. तसेच भजन संस्कृतीला कुठेही गालबोट न लागता भजनं ऐकायला मिळायला पाहिजेत याची दक्षता सर्व आयोजकांनी व्यवस्थितपणे सांभाळली पाहिजे.आयोजकांनी डबल बारी मध्ये एकातरी बुवाने भारूड सादर केले पाहिजे असे भजन ठरविते वेळी दोन्ही बुवांना सांगितले पाहीजे.तरच भजनाला पुर्वीचे हरीनामाचे दिवस नक्कीच येतील आणि भजन रसिकही पुन्हा आत्मविश्वासाने भजन ऐकायला येईल असे भजन सर्व भजनी बुवांनी करावं असे सांगितले. झाले गेले गंगेला मिळाले असे समजून सर्वांनी एकत्र येऊन भजन परंपरा आपणच राखली पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.जेष्ठ बुवांनी नवोदित कलाकारांना सोबतीला घेऊन डबल बारी केली तरच नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी मदत होईल याचा विचार सर्व जेष्ठ बुवांनी करावा असे आवाहन रासम यांनी केले आहे.