शिरगांव | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील कार्यरत बीएससी पदवीधर पदोन्नतीची पदस्थापना न दिल्यामुळे झालेल्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग मार्फत जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्यासमोर सोमवार दिनांक ०८ जुलै २०२४ पासून सकाळी ११.०० वाजलेपासून बेमुदत साखळी उपोषण केले जाणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या काही शिक्षकांनी बीएससी पदवी प्राप्त केलेली आहे. शासन आदेशनुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये इयत्ता ६ वी ते ८ वी साठी विज्ञान पदवीधर म्हणून अशा कार्यरत शिक्षकांमधून विज्ञान विषय शिक्षक म्हणून पदोन्नती द्यावी म्हणून जिल्हा परिषद शिक्षण विभागास वारंवार मध्ये भेट घेऊन सदरची बाब निदर्शनास आणली होती. यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा सिंधुदुर्गतर्फे बीएससी पदवीधर पदोन्नतीसाठी पहिले लाक्षणिक धरणे आंदोलन दिनांक १९ सप्टेंबर २०२३ रोजी केले. सदरची आंदोलनाची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण विभागाने विज्ञान शाखेतील पदवीधर शिक्षकांची तात्पुरती यादी जा.क्र.सिंजिप/शिक्षण/आस्था /४२१४/२०२४, दिनांक २१/०२/२०२४ नुसार पत्राने प्रसिद्ध केली. तात्पुरत्या प्रसिध्द यादीवर हरकत मुदत संपल्यानंतर शिक्षण विभागाने अंतिम यादी सिंजिप/ शिक्षण/आस्था/४२१४/२०२४, दिनांक ०८ मार्च २०२४ नुसार प्रसिद्ध केली होती. परंतु सदर शिक्षकांना पदस्थापना देण्याबाबत कोणतीही कार्यवाही केल्याचे दिसून आले नाही. म्हणून सदर शिक्षकांच्या होणाऱ्या अन्यायाबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक शाखा सिंधुदुर्गतर्फे दिनांक ११ मार्च २०२४ आणि दिनांक १५ एप्रिल २०२४ रोजी असे दोन वेळा शिक्षण विभाग सिंधुदुर्गला पत्र देऊन रखडलेली बीएससी पदवीधर पदोन्नतीची प्रक्रिया राबवावी याचे पुनःस्मरण करून देण्यात आले. तसेच प्रत्यक्ष भेट घेऊन शिक्षण सेवक भरतीपूर्वी पदवीधर पदोन्नती पदस्थापना द्यावी अशी विनंती केली. याबाबत जिल्हा शिक्षण प्रशासनाने असे आश्वासित केले होते की, तुमच्यावर कोणताही अन्याय न करता भरतीपूर्वी पदोन्नती प्रक्रिया राबविली जाईल. त्यानंतरही जिल्हा शिक्षण प्रशासनाने पदोन्नती पदस्थापना प्रक्रिया न राबविल्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा सिंधुदुर्गतर्फे पुन्हा एकदा बीएससी पदवीधर पदोन्नतीसाठी दुसरे लाक्षणिक धरणे आंदोलन दिनांक १० जून २०२३ रोजी केले. तरीही अद्याप पदवीधर पदोन्नतीचा विचार न करताच सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण विभागामार्फत पवित्र पोर्टल अंतर्गत प्राथमिक शाळांत मराठी विषयाची ५६ पदे, इंग्रजी विषयाची ३० पदे आणि विज्ञान व गणित विषयांची ८१ पदवीधर पदे (एकूण पदवीधर १६७ पदे ) दिनांक २३ आणि २४ मे २०२४ रोजी भरण्यात आली. ही पदे भरली असली तरी ४९५ विज्ञान व गणित विषयाच्या पदवीधरांची ३२४ पदे अजूनही रिक्त आहेत.
वरील सर्व बाबींचा विचार करता अंतिम यादी तयार असूनही बीएससी पदवीधर पदोन्नतीची पदस्थापना न दिल्यामुळे झालेल्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग मार्फत जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्यासमोर सोमवार दिनांक ०८ जुलै २०२४ पासून सकाळी ११.०० वाजलेपासून बेमुदत साखळी उपोषण केले जाणार आहे.