एकूण ८ जागांसाठी एकूण १६ उमेदवार होते रिंगणात..!
वैभववाडी | प्रतिनिधी : वैभववाडी तालुक्यातल्या जिल्हा परीषद पूर्ण प्राथमिक शाळा सांगुळवाडी नं. १ या प्रशालेत, ‘शालेय स्वराज मंत्रिमंडळ निवडणूक’ शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाली. या निवडणुकीत, कु. दिशा दीपक पवार हिची मुख्यमंत्री पदी बिनविरोध निवड झाली.





लोकशाही पद्धतीने मतदानाचा हक्क बजावता यावा व लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया समजावी म्हणून जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सांगुळवाडी नं. १ च्या विद्यार्थ्यांची शालेय स्वराज्य मंत्रिमंडळ निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्यात आली. मतदार म्हणून इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक लढविणाऱ्या इ. तिसरी ते सातवीच्या विद्यार्थ्यांपैकी इयत्ता सातवीमधील कु. दिशा दिपक सुतार ही मुख्यमंत्री पदासाठी बिनविरोध निवडून आली, तर उपमुख्यमंत्री मंत्री, सांस्कृतिक मंत्री, सहल मंत्री, अभ्यासमंत्री, क्रीडा मंत्री, स्वच्छता व आरोग्यमंत्री, अर्थमंत्री, पाणीपुरवठा मंत्री अशा आठ मंत्रिपदासाठी १६ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.
निकोप वातावरणात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. मतदान केंद्राध्यक्ष म्हणून मुख्या. सौ. स्नेहलता राणे, मतदान अधिकारी म्हणून शिक्षक श्री. महादेव शेट्ये, श्री. समीर सरवणकर यांनी काम पाहिले. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता शिक्षक श्री. राजेंद्र पाटील यांनी केली. निवडून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व शिक्षकानी अभिनंदन केले.