ब्यूरो न्यूज : नाशिक जवळील ओझर येथील वायुसेना बेस स्टेशनला ‘प्रेसिडेंट कलर्स’चा बहुमान मिळाला असून ही या केंद्रासाठी मोठी भूषणावह बाब असल्याचे मनोगत भारतीय वायु सेनाप्रमुख एअर चीफ मार्शल राम चौधरी यांनी ओझर एअर फोर्स स्टेशन भेटीत व्यक्त केले. अनुरक्षण कमानअंतर्गत ‘सर्वोत्कृष्ट बेस रिपेअर डेपो’चा सन्मान आता स्टेशनने प्राप्त करावा, अशी अपेक्षाही यावेळी चौधरी यांनी व्यक्त केली.
भारतीय वायुसेना प्रमुखपदाची सुत्रे २०२१ साली एअर चीफ मार्शल राकेश कुमार सिंह भदौरिया यांच्याकडून विवेक चौधरी यांनी स्वीकारली. यानंतर त्यांनी प्रथमच नाशिक येथील ओझर वायुसेना स्टेशनला मंगळवारी २३एप्रिलला भेट देत पाहणी दौरा केला. यावेळी वायुसेना परिवार कल्याण संघटनेच्या अध्यक्षा त्यांच्या पत्नी नीता चौधरी यादेखील सोबत होत्या. ओझर वायुसेना स्टेशनच्या वतीने त्यांचे स्वागत वायु अधिकारी कमान्डिंग इन चीफ मेंटनन्स कमांड एयर मार्शल विभास पाण्डेय, तसेच वायुसेना परिवार कल्याण संगठन (क्षेत्रीय) अध्यक्षा श्रीमती रूचिरा पाण्डेय यांनी केले. यावेळी एअर कमोडोर आशुतोष वैद्य यांच्यासह स्टेशनचे विविध अधिकारी उपस्थित होते. ८ मार्च रोजी वायु सेना स्टेशन डेपोला मिळालेल्या प्रेसिडेन्ट कलर्स या विशेष बहुमानाबद्दल विवेक चौधरी यांनी डेपोमधील अधिकारी, कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन केले.
यावेळी वायुसेना डेपोचा इतिहास व माइल्ड स्टोन दर्शविणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनालाही भेट दिली. यावेळी त्यांनी कर्तव्यावर असलेल्या वायुसेनेच्या सैनिकांसह तसेच माजी वायुसैनिकांचीही भेट घेत संवाद साधला. यावेळी श्रीमती नीता चौधरी यांनी वायुसेना स्टेशन ओझरच्यावतीने परिवारा करीता डेपोद्वारा राबविल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची पाहणी केली. या पाहणी दौऱ्याच्यावेळी त्यांनी सुद्धा डेपोच्या वायुसंगीनीसोबत संवाद साधला.