मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथे भराडी देवी यात्रोत्सव २०२४ च्या पूर्वसंध्येला ‘सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड’ यांच्या संयुक्त विद्यमाने बचतगट महिलांनी बनविलेल्या वस्तुंच्या विक्री प्रदर्शनाचे उदघाटन आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत, जिल्हा बॅन्क उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी श्रीफळ फोडून तर संचालिका नीता राणे यांनी फीत कापून केले. यावेळी जिल्हा बॅन्क अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, मुख्य कार्य अधिकारी प्रमोद गावडे, नाबार्ड चे अजय थिटे, भाजप नेते अशोक सावंत, नीता राणे, सौ. सरोज परब, श्री पवार, बिळवस सरपंच सौ मानसी पालव, बाबू आंगणे, मेघनाद धुरी, उद्योजक दीपक परब, महेश बागवे, विलास मेस्त्री, संतोष पालव, देऊळवाडा सरपंच सुरेखा वायंगणकर, किशोर गोवेकर, पी. डी. सामंत, के. बी. वरक तसेच जिल्हा बँक अधिकारी, शाखाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले की आंगणेवाडी जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेली १२ वर्ष बचतगट उत्पादित साहित्य विक्रीचे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केले जाते. जिल्हा बँकेच्या पाठिंब्यातून बचतगटांनी स्वतःचे हक्काचे सुपर मार्केट सुरू करावे. ते देशात पहिले केंद्र असेल. ३६५ दिवस व्यवसाय केल्यास दरडोई उत्पन्न सुद्धा वाढेल. सुपर मार्केट ला जिल्हा बँक व नाबार्ड चे सहकार्य निश्चित मिळेल. काळानुसार पुढील टप्पा या प्रदर्शनाच्या विस्तारातून करायला हवा. तंत्रज्ञान बदलत असताना बचत गटांनी बदल केला पाहिजे. अतिशय चांगले पदार्थ बचतगटाच्या माध्यमातून बनवले जात आहेत. हे प्रदर्शन आणखी विस्तारित व्हावे. मुंबई मार्केट उपलब्ध झाल्यास चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल. खासदार नारायण राणे साहेब केंद्रात आहेत त्यामुळे सतेचा वापर करून बचत गटांना सक्षम करूया असेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले की जिल्ह्यात उत्पादित माल राज्यात पोचला पाहिजे. गेल्या वर्षी ६२ लाखापर्यंत विक्रीचे उद्दिष्ट गाठले आहे. इ कॉमर्स च्या माध्यमातून महिलांनी स्वतःचा प्रयत्न करून चांगले उत्पादन बनवावे. मार्केटिंग सुद्धा चांगले होणे आवश्यकआहे. नाबार्डचे नेहमी सहकार्य बँकेला लाभते. मुंबई मध्ये सुद्धा जिल्हा बँक व नाबार्ड च्या सहाय्यातून प्रदर्शन आयोजित करण्यात येईल. यावर्षी १ कोटींचा विक्रीचा टप्पा गाठूया असेही ते म्हणाले. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांनी आभार मानले.