कणकवली शाळा नं. ३ च्या मुख्याध्यापिका सौ वर्षा वामन करंबेळकर सेवानिवृत्तपर कार्यक्रम संपन्न.
कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शाळा नंबर ३ च्या मुख्याध्यापिका सौ वर्षा वामन करंबेळकर यांचा सेवानिवृत्तपर कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी श्री माऊली मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष व समाजसेवक राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थी म्हणून आज मला आमच्या शाळा नं. ३ च्या मुख्याध्यापिका सौ वर्षा वामन करंबेळकर यांना सन्मानित करण्याचे भाग्य लाभले, ज्यांनी प्राथमिक शिक्षण देऊन घडविले त्या गुरु माऊलींचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे. आम्ही भाग्यवान आहोत असे प्रतिपादन राजेंद्र पेडणेकर यांनी यावेळी केले.यानंतर ते म्हणाले की आम्ही या शाळेमध्ये पहिली ते सातवीपर्यंत प्राथमिक शिक्षण घेतले आणि आज माझ्या बरोबर त्यावेळी शिक्षण घेतलेले माझे सर्व सवंगडी संजय मालंडकर, शरद मुसळे, साधना आळवे, सविता वाळके आम्ही सर्वच आज आप आपल्या क्षेत्रात कार्यरत आहोत.
यावेळी व्यासपीठावर सौ. वर्षा करंबेळकर, श्री.वामन करंबेळकर, परमहंस बाबा भालचंद्र महाराज संस्थान चे व्यवस्थापक विजय केळुसकर, भास्कर गावडे बुवा ,संजय मालंडकर, शरद मुसळे, साधना आळवे, सविता वाळके यांच्यासह, विद्यार्थी, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात सौ. वर्षा करंबेळकर यावेळी म्हणाल्या की,शाळा नं. ३ मधून सेवानिवृत्त होत असताना या शाळेने, विद्यार्थ्यांनी, पालकांनी, सहकारी शिक्षकांनी केलेले सहकार्य आणि दिलेले प्रेम, आपुलकी आपण विसरु शकत नाही. यावेळी १९७६/७७ च्या बॅच च्या वतीने विजय केळुसकर यांच्या हस्ते भास्कर गावडे, आणि राजेंद्र पेडणेकर आणि माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत शाळा नंबर ३ च्या सेवानिवृत्त शिक्षिका सौ वर्षा वामन करंबेळकर यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
शाळा नंबर ३ चे माजी विद्यार्थी आणि माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचे शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सेवानिवृत्त शिक्षिका सौ वर्षा वामन करंबेळकर यांच्या कार्याचा गौरव आपल्या ओघवत्या शैलीत केला.