२ जानेवारी २०२४,
नमस्कार , माझ्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील बंधू भगिनींनो मी राजेंद्र मनोहर पेडणेकर आज नूतन इंग्रजी पर्वाच्या प्रारंभी तुमच्याशी पुन्हा संवाद साधायला मिळतोय त्याबद्दल कृतज्ञ आहे. सर्वांना या नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. या नूतन वर्षाची व्यक्तीगत, कौटुंबिक, सामाजिक व राजकीय अशी विविध स्तरावर संकल्पांतून सुरवात होत असते.
‘व्यक्तीगत व कौटुंबिक संकल्पांना आपण सामाजिक किंवा राजकीय संकल्पांची लेबलं लावून जीवनातील प्रगतीच्या यात्रा समजण्याची व समजावण्याची एक नवीन पद्धत आजकाल राजकीय पटलावर सुरू झाली आहे’, ही आजच्या राजकीय व्यवस्थेची खंत आहे. यामध्ये प्रशासकीय यंत्रणेची मोठी गोची होत असते कारण त्यांना राजकीय इच्छाशक्तीची सर्व कामे ही शासकीय कामे म्हणून करायची कर्तव्यदक्षता पाळता पाळता आता तिच कामे सत्ताधारी राजकीय पक्षांची आहेत असा प्रचार नकळत करायचे एक अलिखीत दडपण आहे. शेवटी प्रशासकीय माणुस हा सरकारी नोकर असल्याने सरकार तर्फे आलेले उघड आदेश व त्यांना आणणारे छुपे राजकीय षडयंत्रकार यांमध्ये जनतेला उत्तरे द्यायला प्रशासन जबाबदार असते अशी आपली यंत्रणा आहे. त्यामुळे याबाबत मी एक राजकीय व्यक्ती आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगामी लोकसभा निवडणुकीचा उमेदवार म्हणून सांगेन की आता जनतेने उघड डोळ्याने प्रत्येक ‘प्रगतीचे तथा जन हीताचे काम करणे व योजनांची अंमलबजावणी करणे ‘ ही प्रक्रीया कोणत्याही लोकप्रतिनिधीचे व पक्षाचे जनतेवर उपकार नसून ती कामे हाच तर शासन निवडून द्यायचा उद्देश असतो हे जाणून घेणे आवश्यक आहे. त्या योजना व ती कामे जी यंत्रणा हाताळते त्या प्रशासकीय व्यवस्थेला जनतेचे सहकार्य असणे किंवा सनदशीर पद्धतीने त्यातील त्रुटी लक्षात आणून देणे हेच या पुढील काळात डोळस सामाजिक सेवकाचे कार्य असेल असेच या पुढील युग अस्तित्वात आले तर स्वार्थी राजकीय तत्वांना लोकशाहीमध्ये थाराच शिल्लक राहणार नाही हे मी अगदी सकारात्मक आशेने सांगू इच्छितो.
‘आम्ही अमूक केले, आम्ही तमुक योजना राबविली, आम्ही क्रांती केली, आम्ही प्रगती केली’ असे भूतकाळ हा आजचा भारत घडवू शकणार नाहीत हे माझे ठाम मत आहे कारण कोणतेही उत्तम काम सुद्धा १००% परिपूर्ण नसते त्यामुळे ‘आधुनीक इतिहास व भूतकाळ हे वाहनाच्या आरशांप्रमामाणे असायला पाहीजेत जे वर्तमानात जीवनाची व यंत्रणांचे सारथ्य करताना अध्येमध्ये सावधानता म्हणून मागे काय घडले हे पहाण्यासाठी वापरता यावेत. सतत वाहनाच्या आरशातच जर आपण बघत राहीलो तर चालकाचा अपघात अटळ आहे व स्वतःसोबत इतरांचेही तो नुकसान करणार हे नक्कीच…अगदी तसेच सरकार चालवताना जर राष्ट्र चालवणारे घटक सतत मागचेच उगाळत बसली व त्याचे फोटो, चित्रफिती दाखवत बसली तर वर्तमानात म्हणजे आज जनहितासाठी काय करणे आवश्यक आहे व पुढील रस्ता, काळ व परिस्थिती कशी आहे याकडे लक्ष केंद्रीत होणार नाही’ परिणामी देशातील सामान्य जनतेचा कधीतरी ‘भीषण अपघात’ होईल ज्याची जबाबदारी घेणारा चालक महाशय कदाचित् भविष्यात निवृत्त झालेले असतील किंवा काही फरारही झालेले असण्याची शक्यता आहे कारण बहुतांशी अपघात स्थळी चालक थांबला तर त्याला जनक्षोभाची भीती असते..! राजकीय चालक वर्गातील कोणा एका व्यक्तीलाही सतत दोष देत राहू नये कारण ते सुद्धा एका प्रकारचे ‘माॅब लिंचिंग’ आहे. त्यात जनतेचा वेळ, कष्ट व बौद्धिक ताकदसुद्धा व्यर्थ होते म्हणून श्री समर्थ रामदास स्वामी यांनी सांगून ठेवले आहे, ” पहावे आपणांसी आपण..!” स्वतःवर निःस्वार्थी सकारात्मकपणे लक्ष केंद्रीत केले तरच कुटुंब, गांव, शहर, समाज, राज्य, देश व पर्यायाने लोकशाही व राजकारण हे एकमेकांना पूरक आहेत याची जाणीव व विश्वास भावी पिढीला निर्माण होईल.
माझे विचार संयमाने वाचल्याबद्दल आणि तुमचा वाढता स्नेह व माया याबद्दल तुमचा शतशः ॠणी आहे. मला फोन व संदेशाद्वारे शुभेच्छा देणार्या सर्वांचे नेहमीच धन्यवाद. कधी तुम्हाला प्रतिसाद देऊ शकलो नाही तरी मी स्वतःहून तुम्हाला फोन तथा संदेश करून संपर्क साधेनच.
“प्राप्तकाल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोदा….” हेच ध्यानात ठेवुन आपण प्राप्तकाल तथा वर्तमान व भविष्यावर लक्ष केंद्रीत करुया. नवीन वर्षात एक साधे तत्व मनाशी बाळगुया, “भूतकाळ हा वाहनाच्या आरशा प्रमाणेच ठेवलेला बरा..!”
धन्यवाद.
( श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर. सिंधुदुर्ग )