देवेंद्र गावडे | उपसंपादक : वयाची तब्बल ८३ वर्षे उलटून गेली तरी अविरतपणे मुक्या जनावरांना म्हणजे पाळीव गुरांना आपल्या आयुर्वेदिक औषधोपचार पद्धतीने ‘नवसंजिवनी’ देणा-या एका ‘देवदूता’चा आज नेरूर-वाघोसेवाडी येथे सन्मान करण्यात आला. सुप्रसिद्ध वैद्य श्री. दिगंबर उर्फ भाऊ वसंत परूळेकर,गोळवण, ता. मालवण यांचे ‘आयुर्वेदिक पद्धतीने गोचिकित्सा’ या क्षेत्रामध्ये गुरांच्या आजारावरती दुर्मिळ वनौषधींचा वापर करून त्यांना दुर्धर आजारातून बरे करणे, पर्यायाने शेतक-यांचे गोधनाबाबत होणारे नुकसान वाचवणे याबाबत फार मोठे योगदान राहीले आहे. आता हा ठेवा पुढच्या पिढीकडे यशस्वीरित्या हस्तांतरीत व्हावा व त्याचा भविष्यात शेतकरी बांधवांना लाभ व्हावा यासाठी नवीन मोलाचे मार्गदर्शन देखील लाभत आहे.

त्यांच्या या पशुवैद्यकिय क्षेत्रातील बहुमूल्य योगदानासाठी आज पवित्र ‘वसुबारस’ सणाचे औचित्य साधून नवजिवन वाघोसेवाडी मित्र मंडळ नेरूर यांच्यावतीने सन्मानचिन्ह तर भारतीय किसान संघ सिंधुदुर्ग यांच्यावतीने श्री बलरामांची प्रतिमा देऊन विद्युत अभियांत्रिकी अधिकारी श्री. धनंजय मिसाळ यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
याप्रसंगी नवजिव वाघोसेवाडी मित्र मंडळाचे पदाधिकारी, किसान भारतीय संघ सिंधुदुर्गचे पदाधिकारी, नेरूर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.