संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी स्विकारला सन्मान.
बांदा | राकेश परब : कोकण कला व शिक्षण विकास संस्था सामाजिक बदल घडवण्यासाठी गेली ११ वर्षे कार्यरत असून शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, महिला सक्षमीकरण आणि बालविकास केंद्र अशा अनेक विषयावर काम करते. रस्त्यावरील मुलांसाठी गली स्कूल, आदिवासी मुलांसाठी युवा किरण, महिलांसाठी पॅड यात्रा आणि लाईवलीहूड जनरेशन शिलाई स्कुल, गांवातील स्वच्छ पाण्यासाठी वॉटर एटीम आणि गरजू महिला आणि मुलांसाठी अनेक उपक्रम करत आहे. संस्था गेली ११ वर्षे सातत्याने कार्यरत असून देशातील ४ राज्यांमध्ये संस्थेच्या कामातून हजारो लाभार्थ्यांना मदत झाली आहे. गेली अनेक वर्षे केलेल्या प्रभावशाली कामातून संस्थेचे समाजासाठीचे समर्पण लक्षात घेऊन संस्थेच्या कार्याबद्दल संस्थेला दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ‘इंडियन सी एस आर अवॉर्ड्स’ मध्ये ‘बेस्ट एनजीओ ऑफ द ईअर’ या राष्ट्रीय पुरस्काराने ‘द हयात सेन्ट्रिक’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात भारतातील शेकडो संस्थानी हजेरी लावली. त्यातील निवडक संस्थाना सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल येथे गौरवण्यात आले. यूपीएस कंपनीच्या डायरेक्टर केरोलीना आणि इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांना प्रदान करण्यात आले.
कोकण कला व शिक्षण विकास संस्थेला मिळालेला पुरस्कार हा संस्थेचे सर्व सहकारी, दाते, सामाजिक दायित्व असणाऱ्या कंपन्या आणि कार्यकर्ते यांच्या मेहनतीचे फळ आहे. या पुरस्काराच्या माध्यमातून केलेल्या कामाचे कौतुक झाले हे सर्व कोकण टीमला नवीन ऊर्जा देणारे ठरेल अशी भावना अध्यक्ष दयानंद कुबल यांनी बोलून दाखवली.