माजी सरपंच व सांस्कृतिक मंडळ अध्यक्ष प्रकाश गावडे यांनी केले दशावतार कलेचे व कलाकारांच्या सांस्कृतीक प्रयत्नांचे विशेष कौतुक…!
बांदा | राकेश परब : कोकणातील व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा वारसा कोकणच्या मातीत कोकणी माणसाने आजमितीपर्यंत आवर्जून जपलेला आहे. दशावतार हे त्याचे ठळक उदाहरण आहे. तो कोकणी माणसाचा सांस्कृतिक ठेवा आहे, असे प्रतिपादन सांस्कृतिक उत्सव मंडळ रोणापाल चे अध्यक्ष तथा माजी सरपंच प्रकाश गावडे यांनी केले.
रोणापाल गावचे सुपुत्र आणि दशावतारी कलाकार संजय अर्जुन गोटस्कर यांचा रोणापाल माऊली मंदिरात सत्कार करण्यात आला. यावेळी प्रकाश गावडे बोलत होते. व्यासपीठावर दशावतारी कला अकॅडमीचे अध्यक्ष दिनेश गोरे, सदस्य बाळू गावडे तसेच मंडळाचे उपाध्यक्ष उदय देऊलकर, सचिव विष्णू सावंत, खजिनदार बाबल तुयेकर, ग्रामस्थ मंगेश गावडे आदी उपस्थित होते.
दिनेश गोरे म्हणाले की, पारंपरिक दशावतारी लोककला टिकविण्यासाठी व वाढवण्यासाठी मी प्रयत्नशील राहील. कोरोनाच्या काळात कलाकारांना शासनस्तरावरून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. कलाकारांना पेन्शन योजना मिळवून दिली, संजय गोटस्कर यांना नाटक कंपनीच्या माध्यमातून दिल्ली, राजस्थान असे दौरे करून पुरस्कार मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, अनेक मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली. संजय गोटस्कर म्हणाले की, माझ्या जीवनातील आजचा हा सोन्याचा दिवस आनंदाचा क्षण मी कधीही विसरणार नाही. माझ्या गावातील लोकांनी व उपस्थित नाट्यरसिकांनी जे प्रेम दाखवून माझा सत्कार केला त्यामुळे मन भरून आले. मी आज येथे उभा आहे तो रोणापालचे कलाकार बाबा सावंत यांच्यामुळेच, असे सांगत श्री. गोठस्कर भावनिक झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आभार मंगेश गावडे यांनी मानले.