कणकवली | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथील पटकी देवी मंदिराजवळ असलेल्या पिकप शेडमध्ये हालाखिच्या स्थितीत असलेल्या एका व्यक्ती बाबत कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांना पटकी देवी मित्र मंडळ कार्यकर्ते व भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी याची माहिती दिली. श्री समीर नलावडे यांनी तात्काळ त्या व्यक्तिची दखल घेत सविता आश्रमाचे संदीप परब यांच्याशी संपर्क साधला. संदीप परब यांनी देखील तत्काळ तिथे कणकवलीत धाव घेतली.व त्या व्यक्तीला संविता आश्रमात आसरा दिला. मूळ गणपतीपुळे येथील प्रकाश शिंदे असे या व्यक्तीचे नांव असल्याची माहिती समोर आली आहे. गेले काही दिवस ते या पिकप शेड मध्ये आसरा घेऊन थांबले होते. अन्न पाण्याविना त्यांचे हाल होत होते. कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे हे सोमवारी सायंकाळी पटकीदेवी मंदिराजवळ गेले असता तेथील मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ही बाब श्री. नलावडे यांच्या निदर्शनास आणली. श्री. नलावडे यांनी यांची अवस्था पाहून सविता आश्रमाशी संपर्क साधला. संदीप परब यांनी कणकवलीत आल्यावर त्या व्यक्तीची अवस्था पाहिल्यानंतर त्याला प्राथमिक सोपस्कार पूर्ण करून पोलीस स्टेशनमध्ये नोंद करत सविता आश्रमात दाखल करून घेण्याचे मान्य केले.तसेच यावेळी संविता आश्रमाच्या सुरू असलेल्या बांधकामाच्या अनुषंगाने ४० गोणी सिमेंट ची आवश्यकता असल्याची बाब श्री परब यांनी माजी नगराध्यक्ष नलावडे यांच्या निदर्शनास आणली. त्यानंतर श्री नलावडे यांनी ४० गोणी सिमेंट करिता लागणारी १६ हजाराची रक्कम तात्काळ श्री. परब यांना सुपूर्द केली.
माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दाखविलेल्या या दातृत्व बद्दल परब यांनी समाधान व्यक्त केले आहे. तसेच संदीप परब यांनी तात्काळ धाव घेऊन या निराधार व्यक्तीला आसरा दिल्याबद्दल त्यांची प्रशंसा होत आहे. यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष दीपक बेलवलकर, माजी नगरसेवक अण्णा कोदे, दीपक डगरे, मंगेश उबाळे, किशोर घुरसाळे, किरण हुमरसकर आणि पटकी देवी मंदिर नजीकचे नागरीक उपस्थित होते.