मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरचे माजी नगरसेवक नितीन वाळके यांनी शासकीय शाळा खाजगीकरण विषयी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचे शिक्षण क्षेत्र मुंबईतील मनपाच्या अख़त्यारीतील शासकीय शाळांच्या खासगीकरण करण्या बाबतच्या शिक्षणमंत्र्याच्या प्रस्तावाने थोडे संमिश्र आहे. याच संदर्भात सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांनी शिक्षणमंत्र्यांकडे पालिका हद्दीतील शासकीय शाळा पूर्वीप्रमाणे संबंधीत नगरपालिका, परिषदा, पंचायतींकडे वर्ग करण्याची केलेली मागणी अगदी योग्य असल्याचे मत माजी नगरसेवक नितीन वाळके यांनी व्यक्त केले आहे. नगरपरीषद हद्दीतील शाळांतून बहुतांशी त्या पालिका क्षेत्रातील नागरीकांचीच मुले शिकत असतात. मधल्या काळात या शाळा नगर परीषदेकडून जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत झाल्याने पालिकेमधील शिक्षण समित्यांची गरज संपून त्या रद्द झाल्या. परिणामी शाळा शाळांतून चाललेल्या दैनंदिन कामकाजावर असणारी पालिकेची देखरेख आपोआप कमी किंवा दुर्लक्षीत झाली व पालिकेचा संबंध फक्त पालिकेच्या मालकीच्या त्या शाळांच्या इमारतींच्या दुरूस्ती पुरताच मर्यादीत झाला.
जर महानगरातील प्राथमिक शाळा चालवणे सरकारला जमत नसेल तर त्याच निर्णयाचा विस्तार करून पालिका हद्दीतील प्राथमिक शाळा ही त्या त्या पालिकेकडे पुर्वी प्रमाणेच चालविण्यास द्यायला काहीच हरकत नाही. यामुळे पालिकेच्या बांधकाम-नियोजन समित्या पुरत्या मर्यादीत झालेल्या या शाळांची व्यवस्था लावण्यासाठी पालिकेमधील शिक्षण विभागही कार्यान्वित होऊन अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधांसाठी पालिकेकडील निधी खर्च करणे शक्य होईल. माजी नगराध्यक्ष साळगावकरांनी केलेल्या या मागणीला संपूर्ण पाठिंबा व्यक्त करतानाच राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर स्वतः पालिकेच्या नगराध्यक्ष फेडरेशनचे अध्यक्ष असताना तत्कालीन सरकारकडे त्यांनीच केलेल्या याच मागणीचे रूपांतर शासन निर्णयात करतील अशी आशाही माजी नगरसेवक वाळके यांनी व्यक्त केली आहे.