खारेपाटण | प्रतिनिधी : यंदाच्या गणेश चतुर्थी सणानिमित्त लाखो भाविक गणेशभक्त हे मुंबई, पुणे तसेच इतर शहरातून आपल्या गावी कोकणात येत असतात. या गणेशभक्तांच्या सेवेसाठी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर म्हणजेच खारेपाटण टाकेवाडी येथे मोफत सुविधा केंद्राची उभारणी केली असून ही सुविधा केंद्रे गणेशभक्तांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहेत. येणाऱ्या गणेशभक्तांना कोणतीही अडचण असेल तर या सुविधा केंद्राच्या मदतीने त्यांची अडचण दूर केली जाणार असून गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा या हेतूने ही सुविधा केंद्रे उभारण्यात आली आहेत. यामध्ये पोलीस मदत केंद्र, वैद्यकीय सेवा केंद्र, विश्रांती कक्ष, चहा-बिस्कीट व्यवस्था, सुलभ शौचालय व्यवस्थेची गणेशभक्तांच्या सेवेसाठी उभारणी केली आहे. आरोग्य पथकांच्या वतीने गणेशभक्तांना कोणत्याही आरोग्याच्या समस्या असतील तर त्या वैद्यकीय सेवा केंद्राच्या मदतीने सोडवण्यासाठी आरोग्य पथक देखील ठेवण्यात आले आहे.
कोकणात येणाऱ्या सर्व गणेशभक्तांनी आपल्याला हव्या असणाऱ्या या सुविधा केंद्राचा लाभ घेण्याचे आवाहन सार्वजनिक विभागाने केले आहे.