मालवणातील सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धेच्या ९ व्या वर्षाची चुरस आज सायंकाळी अनुभवता येणार.
मालवण | सुयोग पंडित : सण दरवर्षी येतात. अगदी घरगुती स्तरांवर देखील ते सण साजरे करताना प्रसंगी तडजोडी करायची वेळ येते. मूळ धार्मिक भाव जपताना दरवर्षी सांस्कृतिक साज जपण्यासाठी खूप आटापिटा करावा लागतो आणि त्या आटापिटा करण्यात सांस्कृतिक साज आखणारे घटक कोमेजले जातात. मालवणच्या सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या बाबतीत नेमके उलटे चित्र दिसून येते. दरवर्षी त्यांच्या उत्सव क्षमतेचा कल्पवृक्ष आणखीन डेरेदार बनतो आणि त्यांच्या सामाजीक शहाळ्यांच्या मधुर वाढीव सामाजिक फलश्रुतीचे प्रमाण दरवर्षी वाढते.
सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धेचे यंदा ९ वे वर्ष आहे. पहिल्याच वर्षापासून जो ‘महिलांसाठी आनंदाचे क्षण द्यायचा’ धागा आहे तो आता ९ वर्षांच्या विणीचा घट्ट असा ‘शिवरेशीम बंध’ बनला आहे. भेदाभेद व तंटामुक्त असा हा भव्य उपक्रम राबवण्याची संकल्पना जेंव्हा सौ. शिल्पा यतीन खोत यांना आली तेंव्हा नुसता पैसा ही त्या उत्सवाची गरज नव्हती तर समाजातील सर्व घटकांबद्दल प्रेम, सर्वांच्या डोळ्यात आनंदाची चमक आणि सोबत महिलांमधील विजिगीषू वृत्ती जागृत होती, आहे व राहील याचा जाहीर जागर प्रसार करायची इच्छा शक्ती हे घटक गरजेचे होते जे या मित्रमंडळाचे आधारभूत स्तंभ सौ. शिल्पा यतीन खोत व श्री. यतीन परशुराम खोत या दांपत्याकडे भरभरुन होते. जेंव्हा समासाजाला सकारात्मक ऊर्जा परावर्तित होते तेंव्हा दरवर्षी येणारा उत्सवाचा कार्यक्रम हा नुसता कार्यक्रम रहात नाही तर ‘पर्वणी’ बनतो. अशी पर्वणी हे मित्रमंडळ नवरात्रैत्सवात सुद्धा साध्य करतातच हे विशेष..! खिन्न, विछिन्न व विभिन्न विवंचनांनी पार पडलेला ‘कोरोना काळ’ देखील या पर्वणीला आणि त्यातील ‘शिवरेशीम सामाजिक बंधाला’ तोडू शकला नाही…परंपरा मोडली गेली नाही.! सौ. शिल्पा यतीन खोत या परंपरेला फार जपणार्या एक धाडसी व्यक्तिमत्व आहेत. प्रसंगी काळाच्या खूप पुढे जाणे धोकादायक असते परंतु त्यांचे उपक्रम हे ‘ट्रेंड’ बनतात आणि काळ सुद्धा निमूटपणे हजारो जणांना हसवत खेळवत त्यांच्या उपक्रमांचा हिस्सा बनतो.
काल सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धेच्या विविध बक्षिसांचे अनावरण झाले. विजेत्या स्पर्धक महिलेला सोन्या चांदीने मढवलेला नारळ, सोन्याचे नाणे, उपविजेत्या महिलेला सोन्याचे नाणे, सोन्याची नथ,
तृतीय व चतुर्थ विजेत्या स्पर्धक महिलांना सोन्याची नथ, अंतिम फेरीत पोहोचणार्या स्पर्धक महिलांना चांदीची भेटवस्तू सोबतच प्रेक्षकांसाठीही विशेष लकी ड्राॅ मधून चांदीच्या भेटवस्तू अशी बक्षिसांची खचाखच रेलचेल या पर्वणीत असणार आहे.
मालवणच्या ऐतिहासिक बंदर धक्का येथे आज सायंकाळी ४ वाजता पक्ष, जात, वय, लिंग, सामाजीक, आर्थिक भेद विसरून केवळ आनंद देणारी ही पर्वणी संपन्न होणार आहे. ती बघताना, अनुभवताना तिथल्या प्रत्येक व्यक्ती घटकाला एक विचार नक्कीच येईल ,” सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाची गोष्टच न्यारी आहे…दर्याच्या साक्षीने दर्याला सामाजिक वंदना द्यायची त्यांची सांस्कृतिक पद्धत ‘लय भारी’ आहे..!”