शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने भाजपात काय चाललेय याची चिंता न करण्याचा दिला सल्ला.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे तालुका अध्यक्ष खोबरेकर यांनी भाजपच्या नेत्यांचा टीकेतून समाचार घेतला होता. त्यांच्या टीकेला भाजप भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी बाळा गोसावी यांनी उत्तर दिले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तालुकाध्यक्षांनी भाजपमध्ये काय चाललेय, कोण कोणाविरुद्ध कुटील डाव करतो याचा शोध लावण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचा अस्तित्व टिकवण्यासाठी काम करावे असे सांगत सध्या माजी खासदार डॉ निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्ष प्रवेश मोठ्या जोरात चालू असल्यामुळे खोबरेकरांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळेच खोबरेकर सैरभर झाले असावेत,त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची चिंता करू नये. २०२४ ला भाजपचा आमदार निवडून येणार आणि भाजपच गुलाब उधळणार यात तीळ मात्र शंका नाही असे प्रतिपादन बाळा गोसावी यांनी केले.
मालवण कुडाळ मध्ये विकास झाला असे खोबरेकर म्हणाले मग या विधानसभा मतदारसंघातील भटक्या विमुक्त जाती,धनगर वस्त्या का अजून विकसित झाल्या नाहीत, का अजून त्यांच्या वाडी वस्तीवर ती रस्ते पोचले नाहीत, मेल्यानंतर जाळण्यासाठी स्मशानभूमी देखील काही ठिकाणी मिळाले नाहीत असे का, का अजून त्यांना दैनंदिन जीवनामध्ये अडचणींचा सामना करावा लागतो, पर्यटन स्थळांचा उद्धार का नाही झाला, उद्योगधंदे किती आणले युवकांसाठी काय केले महिलांसाठी काय केले याची उत्तरे खोबरेकरांनी द्यावी. साडेसात वर्ष सत्तेतील आमदार असून सुद्धा वैभव नाईक मालवण तालुक्याचा विकास करण्यास निष्क्रिय ठरलेले आहेत त्यामुळे निश्चितपणाने यावेळी अमुलाग्र बदल होऊन भाजपचाच आमदार निवडून येईल. त्यामुळे शिवसेना उद्धव गटाच्या तालुका अध्यक्षांनी आपला पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावे भाजपमध्ये काय चाललय त्या ठिकाणी डोकावून पाहू नये असा सल्ला बाळा गोसावी यांनी खोबरेकरांना दिला आहे. पुन्हा आमच्या नेत्यांवरती टीका केल्यास जशास तसे उत्तर देऊ असा इशाराही गोसावी यांनी खोबरेकरांना दिला आहे.