नाभिक संघटना जिल्हा महिला अध्यक्ष सौ. प्रतिभा चव्हाण व इतर पदाधिकारी यांनी जास्तीत जास्त उपस्थितीचे केले आवाहन.
कणकवली | गणेश चव्हाण : नाभिकाचा जन्म कसा झाला, हे पौराणीक कथेवर आधारीत, नाभिकांचे संत शिरोमणी सेना महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित ‘विठ्ठलभक्त सेना’ हे नाभिक कलावंत दशावतारी प्रारंभिक नाटक सादर होणार आहे. नाभिकांची महती सांगणारा हा प्रयोग करण्याची संकल्पना, सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेची असून, शुभारंभाचा प्रयोग, सोमवारी १४ ऑगस्टला मम महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे संघटक विजय सि. चव्हाण व सरचिटणीस राजन पवार यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. याचा नाभिक समाजासह, सर्व समाजाने लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अध्यक्ष जगदिश चव्हाण यांनी केले आहे.
नाभिकाला आपल्या समाजाचे महत्व पटवून देऊन समाजा बद्दल ओढ लागावी व एकदिलाने संघटीत होऊन, समाज परिवर्तनास मदत व्हावी अशा उद्देशाने या नाट्य प्रयोगाचे आयोजन करावे असे मत, माजी जिल्हाध्यक्ष अनिल अणावकर, शेखर चव्हाण, प्रविण कुबल यांनी संघटणे समोर मांडले. जिल्हा सभेत ठराव घेऊन, संघटनेने नाटकाचे आयोजन केले.
भालचंद्र महाराज संस्थान, कणकवली येथे सोमवार १४ ऑगस्टला दुपारी २ वाजता हे दशावतारी नाटक सुरु होणार आहे. या दशावतारी नाटकामध्ये नाभिक समाज कलाकार यशवंत तेंडोलकर, विलास वालावलकर, अनंत चव्हाण, नीरज पवार, शुभम पवार, सौरभ तोरस्कर, चंद्रशेखर तोरस्कर, अमित पाटकर, कृष्णा लाड, विश्वास पवार, मयूर पवार, श्रीकृष्ण आकेरकर, आणि संत सेना महाराजांच्या मुख्य भूमिकेत विजय (पपू) कृष्णकांत चव्हाण असे नाभिक बंधु कलाकार म्हणुन असणार आहेत. तर हार्मोनियम अमोल आकेरकर, पखवाज राजेश आकेरकर, तालरक्षक प्रमोद आकेरकर यांची साथ लाभणार आहे. नाटकाचा पहिलाच शुभारंभाचा प्रयोग मोफत असल्याने, सर्वांनी वेळीच उपस्थित राहून नाटकाचा लाभ घेण्याचे आवाहन सिंधुदुर्ग नाभिक संघटनेच्या जिल्हा महिला अध्यक्षा सौ. प्रतिभा चव्हाण, जिल्हा युवा अध्यक्ष रुपेश पिंगुळकर, कणकवली तालुकाध्यक्ष रोशन चव्हाण, महिला तालुकाध्यक्षा सौ. तेजस्विनी कुबल, तालुका युवा अध्यक्ष रुपेश चव्हाण यांनी केले आहे.