गडग्यावरुन क्रिकेट | (भाग : ४ )
सुयोग पंडित | मुख्य संपादक : ही गोष्ट आहे मालवणमधल्या देऊळवाड्यातल्या एका शालावयीन मुलाची. अभ्यासात व कलेत हुशार असलेल्या त्या मुलाला ना शाळा फारशी आवडायची की त्याला कलेतही करीअर करायचे नव्हते कारण तो त्याही पेक्षा क्रिकेट या खेळात हुशार होता. क्रिकेट खेळ व त्यातील विश्लेषक अभ्यासू विचार त्याच्या रोमारामांत संचार करुन वावरत होते. त्याच्या वडिलांना हे जेंव्हा लक्षात आले तेंव्हा त्यांनी एकदा त्याला शांतपणे बाजुला घेऊन विचारलं ,” बाळा तुला शाळा फारशी का आवडत नाही? अभ्यासात तर तू हुशार आहेस तरिही शाळेतील शिक्षणावर मनापासून का प्रेम करत नाहीस?” तो मुलगा जेमतेम १० ते १२ वर्षांचा असेल. थेट वडिल काहीतरी विचारतायत म्हणाल्या वर आधी थोडंसं बावरुन पण नंतर स्वतःला सावरुन त्याने उत्तर दिले,” मला क्रिकेटर व्हायचे आहे..म्हणून..!” त्याचे वडिल थोडे थांबले आणि त्यांनी त्याला हळू हसत विचारले,” ठीक आहे…पण जर तू क्रिकेटर बनलास आणि एखाद्या दुसर्या देशात गेलास तर तिथे इतरांशी संवाद कसा साधणार? तुला इंग्लिश भाषा, मूलभूत व्यवहार आणि इतर गोष्टी कशा समजणार? भूक लागल्या नंतर हाॅटेलमध्ये काहीतरी मागवायचे असेल तर परक्या देशात कसे मागवणार..?” तो मुलगा थोडा थबकला…जेमतेम १० ते १२ वर्षांचा तो बावचळला. त्याचा गोंधळ लक्षात घेऊन वडिल म्हणाले ,” अरे..क्रिकेट एकदम छानच खेळ आहे. तू क्रिकेटर नक्कीच बनशील परंतु जीवनात जर सर्वांगीण टिकायचे असेल तर तुला मन लावून शाळेत जाऊन शिकावेही लागेल. शाळा आपल्याला खेळ व स्पर्धा दोन्ही शिकवते. तू शाळेत मनापासून गेलास तर तुझे कुठे काहीच अडणार नाही…!”
वरील घटना साधारण ३५ वर्षांपूर्वीची असावी. त्यानंतर तो मुलगा शाळेशी, शिक्षणाशी व सर्वांगीण विकासाशी इतका वचनबद्ध आहे तो आजपर्यंत…! आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तो एक नावाजलेला क्रिकेटपटू म्हणून देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. तो आहे मालवण मधील देऊळवाड्यातल्या श्री. राजू आचरेकर..!
बरोब्बर १ जानेवारीला उगवलेल्या नविन वर्षाच्या सूर्य पहात जन्मलेला राजू आचरेकर हा नुसताच क्रिकेटर, क्रिकेटप्रेमी नसून तो क्रिकेट मधील विद्वान म्हणजे ‘विशारद’ अशा व्यक्तिंच्या पंक्तीत बसतो. खेळाडुंच्या कामगिरीचे आकडे तोंडपाठ असले तर एखाद्याला आपण ‘क्रिकेट पंडित किंवा ज्ञानी’ म्हणू शकतो परंतु ‘क्रिकेट विशारद’ म्हणजे जो स्वतः उत्तम क्रिकेट खेळतो, दुसर्याला मैदानावर शिकवू शकतो, खेळातील शारिरीक व मानसीक बारकावे अभ्यासू शकतो, चांगल्या खेळात आणखीन सुधारणा सुचवू शकतो आणि स्वतः थंड डोक्याने क्रिकेटमधील विश्लेषण हे समजावून घेऊन सांगू शकतो..!
राजूने देऊळवाड्यात, मराळवाड्यात क्रिकेट खेळायला सुरवात केली. एम. आर .आय. किंवा बी. आर. आय. च्या जड चेंडूवर ओव्हर आर्म क्रिकेटने सुरवात केलेल्या राजूची शरीरयष्टी पाहून एखादा संघ त्याला हलक्यात घेऊ शकत नाही कारण त्याच्याकडील कमालीची नजर, प्रतिस्पर्धी गोलंदाजाच्या मेंदूत शिरायची कला, कमालीची नजाकत असलेली मनगटी फटक्यांची ताकद आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याचे ‘फूटवर्क…किंवा पदलालीत्य..!’ राजूला खेळताना पाहिलेले व त्याच्या कडून शिकलेले त्याची ‘न हरायची’ शक्ती जाणतात. १९८८ नंतर मालवणात झपाट्याने लोकप्रीय झालेले ‘अंडर आर्म बाॅक्स क्रिकेट’ या प्रकारात युवा राजू आचरेकरची लोकप्रीयता खूप वाढत गेली. लहान मुलांना ‘राजू सारखे खेळावे…रात्र रात्रभर चालणार्या राजूच्या सामन्यांना अनुभवत रहावे, त्याचा खेळ अक्षरशः डोळ्यात साठवत तशी फलंदाजी, क्षेत्ररक्षण करावे’ असे वाटू लागायचे यातच राजूची क्षमता लक्षात येते. त्याचे ‘सणकन्’ बसणारे फटके व चपळ क्षेत्ररक्षण हे घटक तर अक्षरशः तत्कालीन मुलांसाठी ‘क्रेझ’ होती. नेहमी हलकी बॅट वापरुन देखील त्याच्या फटक्यांची ताकद अफाट होती.
आजकाल क्रिकेट किंवा कुठल्याही क्रीडा प्रकारासाठी विशेष गणवेश, शूज, गुगलवर माहिती, मैदानांवर सुविधा, भरगच्च वैयक्तिक रकमांच्या स्पर्धा उपलब्ध आहेत परंतु हाफ शर्ट घालून, बॅगी पॅन्टच्या खिशात तुटपुंजे पैसे ठेवून, सायकल दामटत, अभ्यास, शिक्षण मनापासून सांभाळत क्रिकेट खेळत जगलेला, विश्लेषण केलेला असा हा खेळाडू. मालवण सारख्या ठिकाणी राहून पूर्ण वेळ टेनीस किंवा लेदर क्रिकेट मध्ये थेट करीअरचा तो काळ नव्हता. त्यावेळी स्वतःच्या नशिबाला वगैरे दोष न देता, हसतमुखाने शिक्षण पूर्ण करत करत आनंदाने क्रिकेट जगलेला तो एक माणूस आहे.
वडिलांनी समजावलेले शैक्षणिक महत्व त्याने मनापासून समजावून घेतले आणि आश्चर्य वाटेल श्री. राजू आचरेकर आज ‘प्रतिथयश शिक्षक, खेळाडू व सामाजिक जाणिवेचे व्यक्ती’ आहेत.
‘पाय हा क्रिकेट या खेळातील सर्वात महत्वाचा घटक आहे म्हणून फूटवर्कवर सतत काम करावे’ अशी शिकवण देणारे राजू आचरेकर यांचे पाय नेहमी जमिनीवर राहीले व त्यामुळे ते ‘खरेखुरे क्रिकेट विशारद किंवा बॅचलर इन क्रिकेट’ म्हणता येतील. संगीत, शास्त्र, नृत्य, साहित्य, कला, शिक्षण वगैरे विषयांत विशारद ही पदवी एखाद्या शैक्षणिक संस्थेतून किंवा ॲकॅडमितून प्राप्त होते व तिथेही मेहनत असतेच परंतु अनिश्चिततेचा खेळ असलेल्या क्रिकेट मध्ये अजून ती पदवी प्राप्त होत नाही.
आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल व गडग्यावरुन क्रिकेटच्या सर्व टीमतर्फे या ‘क्रिकेट विशारद श्री. राजू आचरेकर’ यांना सलाम..व शुभेच्छा.
आपली सिंधुनगरी चॅनेल | गडग्यावरुन क्रिकेट