बांदा / राकेश परब : बांदा रोटरी क्लबने स्थापनेच्या पहिल्याच वर्षी ४० हून अधिक समाजाभिमुख उपक्रम राबविले. याची दखल रोटरी क्लबच्या राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. रोटरीच्या नियमानुसार नूतन पदाधिकारी निवड करण्यात आली आहे. आगामी एका वर्षासाठी माजी जि. प. सभापती प्रमोद कामत यांची बांदा रोटरी क्लबच्या प्रेसिडेंट पदी निवड झाली आहे. नूतन पदाधिकार्यांचा पदग्रहण सोहळा मंगळवार १८ जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्वामी समर्थ सभागृहात जिल्हा गव्हर्नर नासीरभाई बोरसादवाला यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती मावळते प्रेसिडेंट मंदार कल्याणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आनंदी मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सचिवपदी नरसिंह काणेकर व खजिनदारपदी शिवानंद भिडे यांची निवड करण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी नूतन प्रेसिडेंट प्रमोद कामत, व्हाईस प्रेसिडेंट सुदन केसरकर, योगेश परुळेकर, रत्नाकर आगलावे, हनुमंत शिरोडकर, सुधीर शिरसाट, आपा चिंदरकर, सचिन मुळीक, फिरोज खान, सिताराम गावडे उपस्थित होते.
प्रमोद कामत म्हणाले, स्थापनेच्या वर्षभरात रोटरी क्लब ऑफ बांदाने लक्षवेधी कामगिरी केली. वर्षभरात ४० हून अधिक समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात आले. आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक स्तरावर काम करण्यात आले. आयुष रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा हजारो रुग्णांना फायदा झाला. परिसरातील ६ टीबी रुग्णांना दरमहा त्यांच्या कुटुंबासाठी लागणारे धान्य वर्षभर पुरविण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, सायकल वाटप, युवतींना सॅनिटरी पॅड, वैद्यकीय उपचारासाठी गरजू रुग्णांना मदत, वृक्षारोपण या सारखे अनेक उपक्रम राबविण्यात आले. ते पुढे म्हणाले, बांदा रोटरॅक्ट क्लबने सुद्धा उल्लेखनीय काम केले. त्यामुळे पहिल्याच वर्षी त्यांना उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार मिळाला. भविष्यातही रोटरीचे काम अधिक जोमाने करण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.