मालवण | सुयोग पंडित : सामाजिक कार्यकर्ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जीवन आनंद संस्था व संविता आश्रमातील निराधारांना शोधून त्यांना आधार व डोक्यावर छत द्यायचे सामाजिक व्रत अखंड सुरु आहे. या अंतर्गत ११ जुलैला रात्री त्यांनी गोवा येथील म्हापसा टॅक्सी स्टॅंड परीसरातील फुटपाथवर निराधार व्यक्तींच्या समस्या जाणून घेतल्या. नेमकी परिस्थिती काय आहे ते वास्तव जाणण्यासाठी संदीप परब नेहमी फुटपाथवरच झोपून किंवा वावरुन निराधारांबद्दलची माहिती घेतात. यावेळीही त्यांनी तीच पद्धत अवलंबत फूटपाथवर रात्र काढली.
या दरम्यान कृष्णा प्रधान (वय ५०) ह्या निराधार व्यक्तीला आधाराची आवश्यकता आहे हे कळल्यानंतर त्यांनी म्हापसा पोलिसांच्या मदतीने कायदेशीर बाबी पूर्ण करुन त्यांना संविता आश्रम, सिंधुदुर्ग येथे दाखल केले. जनसामान्यांचे प्रोत्साहन व कायदा यंत्रणा देत असलेल्या सहकार्यामुळे ही सेवा सुरु आहे अशी प्रांजळ प्रतिक्रिया संदिप परब यांनी माध्यमांना दिली आहे.