बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोस येथील विद्याविकास हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या छोट्या वयाच्या विद्यार्थिनींना सायंकाळी परतीच्या प्रवासावेळी एस.टी बस वेळेत उपलब्ध नसल्याने दररोज कोंडुरा तिठा ते मळेवाड असे पायी चालत कराव्या लागणाऱ्या ३ ते ४ किलो मीटर अंतराच्या पायपीटीच्या पार्श्वभूमीवर ०६ जुलै २०२३ रोजी पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्रच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीच्यावतीने वेंगुर्ला आगाराचे स्थानक प्रमुख श्री. विशाल निवृत्ती शेवाळे यांना निवेदन देण्यात आले होते. यानिवेदनावर तत्काळ कार्यवाही करताना कनयाळ-शिरोडा-बांदा ही बस आज दुपारी कोंडूरा तिठा येथे शाळा सुटल्यानंतरच्या वेळेत, म्हणजेच सायंकाळी सुमारे ४:४० वाजता दाखल झाली. यावेळी आनंदीत झालेल्या चिमुकल्या शालेय विद्यार्थिनींनी या बसचे चालक व वाहक यांचे गुलाबपुष्प देत स्वागत केले. याकामी पुढाकार घेत प्रयत्न करणाऱ्या पत्रकार संरक्षण समिती, सिंधुदुर्गचे उपखाजिनदार श्री. मदन मुरकर यांचे व पत्रकार संरक्षण समिती सिंधुदुर्गच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
यावेळी पत्रकार संरक्षण समिती महाराष्ट्राचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष श्री. प्रसाद मडगांवकर यांनी फोन वरून पत्रकार संरक्षण समिती, सिंधुदुर्गच्या वतीने राज्य परिवहन महामंडळाचे वेंगुर्ले आगार स्थानक प्रमुख श्री. विशाल निवृत्ती शेवाळे यांच्या कार्यतत्परतेबद्दल त्यांचे व वेंगुर्ला एसटी आगार सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाचे आभार व्यक्त केले.