राकेश परब | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथील ज्येष्ठ महिला पत्रकार मंगल कामत यांच्या जीवनातील संघर्षाचे चित्र रेखाटण्यात आलेल्या ‘माझा जीवनप्रवास’ या आत्मचरित्राचे प्रकाशन नुकतेच नट वाचनालयाच्या सभागृहात करण्यात आल. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी बांदा सरपंच श्रीमती प्रियांका नाईक,कार्यक्रमाचे उद्घाटक माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत,प्रसिद्ध वकील ॲड.संदीप निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.श्वेता कोरगावकर, बांदा पोलीस निरीक्षक शामराव काळे,जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, सचिव देवयानी वरसकर, प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ.रुपेश पाटकर,संपादिका सीमा मराठे,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान,ग्रामपंचायत सदस्य सौ.रुपाली शिरसाट,वाफोली उपसरपंच विनेश गवस आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी डॉ.रुपेश पाटकर बोलताना म्हणाले मंगल कामत या महिला असूनही कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याची त्यांची इच्छाशक्ती वाखाणण्याजोगी आहे.जीवनात घडलेल्या वाईट घटनेची कोणतीही कटुता न ठेवता त्यांनी इथपर्यंत केलेला प्रवास कौतुकास्पद आणि इतरांना मार्गदर्शक आहे.पुरुष सत्ता असलेल्या या क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणार्या मंगल कामत यांचे सामाजिक कार्यही ठसा उमटवणारे आहे.कामत यांच्या या आत्मचरित्रामुळे एक नवी ओळख मंगल कामत यांची होईल असा विश्वास डॉ रुपेश पाटकर यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा बांदा सरपंच श्रीमती प्रियांका नाईक म्हणाल्या,मंगल कामत यांच्यावर जसे कठीण प्रसंग आले तसे प्रसंग एखाद्या महिलेवर आले असते तर ती कोलमडून गेली असती.मात्र मंगल कामत यांनी या प्रसंगांना धैर्याने तोंड देत आपले कार्य सुरू ठेवले.त्यांच्यातील हीच जिद्द व इच्छाशक्ती त्यांना आज या यशस्वी वळणावर घेऊन आली आहे.त्यांचा हा आदर्श महिलांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
पोलीस निरीक्षक शामराव काळे म्हणाले,दक्षता कमिटीत असलेल्या मंगल कामत यांच्यामुळे अनेक संवेदनशील प्रकरणे हाताळताना आम्हाला सहकार्य व मार्गदर्शन लाभते.त्यांच्यामुळे बरेच संसार उध्वस्त होण्यापासून आम्ही वाचवू शकलो.मंगल कामत यांच्याबद्दल जेवढे ऐकलं होतं त्याहीपेक्षा त्यांचं कार्य अतिशय कौतुकास्पद आहे.
ॲड.संदीप निंबाळकर म्हणाले,मंगल कामत यांच्या जीवनातील २००२ मधील ५८ दिवस हे जीवनाला वेगळी दिशा देणारे होते.मात्र त्यांनी डगमगून न जाता धैर्याने या प्रसंगाला तोंड देत योग्य दिशेने मार्गक्रमण करत आपली ओळख निर्माण केली.एक महिला असूनही अनेक अडचणींचा सामना करत त्यांनी मिळवलेलं हे यश अभिमानास्पद आहे.त्यांनी आपल्या आत्मचरित्रात उल्लेख केलेल्या गोष्टींचा मी स्वतः साक्षीदार आहे.त्यामुळे कामत यांच्या धीरोदात्त वृत्तीचे कौतुक असल्याचे सांगत शुभेच्छा दिल्या.
ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान म्हणाले,मी मंगल कामत यांना शिक्षणाचे धडे दिले आहे.माझी मंगल विद्यार्थिनी आहे म्हणण्यापेक्षा मी तिचा शिक्षक आहे असे म्हणण्यासारखे कार्य आज मंगल कामत यांच्याहातून घडलं आहे.त्यांनी दाखवलेली जिद्द,चिकाटी,धैर्य हे येणाऱ्या पिढीला निश्चितच मार्गदर्शक ठरेल.प्रतिकूल परिस्थितीतही संयम ठेवला की यशश्री प्राप्त होते हे मंगल कामत यांच्याकडे पाहिल्यावर दिसून येते.मंगल कामत यांनी आत्मचरित्र प्रसिद्ध केले ते थोडक्यात आहे.या आत्मचरित्राचा पार्ट टु यावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी माजी सभापती प्रमोद कामत,माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.श्वेता कोरगावकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर,संपादिका सीमा मराठे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या.

यावेळी बांदा पत्रकार परिवारातर्फे मंगल कामत यांचा सत्कार बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्याहस्ते करण्यात आला.
आत्मचरित्राचे प्रकाशन झाल्यानंतर आपल्या मनोगतात मंगल कामत यांनी त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगाची आठवण सांगताना आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.त्या प्रसंगात एकवेळ आत्महत्या करण्याचा विचारही मनात आला,मात्र घरी आई वाट पाहत आहे हे लक्षात येताच तो विचार काढून टाकला.त्या प्रसंगात माझं कुटुंब माझ्या पाठीशी राहील.डॉ.पाटकर,ॲड.निंबाळकर यांच्यासारख्या व्यक्तींनी खंबीर साथ दिली,त्यामुळेच मी पुन्हा उभं राहू शकले असे मंगल कामत यांनी सांगितले.यावेळी मंगल कामत यांनी सांगितलेल्या त्या कटू प्रसंगामुळे त्यांच्यासह उपस्थितही गहिवरले.मंगल कामत यांनी या आपल्या प्रवासात सहकार्य केलेल्या सर्वांचे आभार मानले.
बांदा पत्रकार परिवारातर्फे आयोजित या प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक पत्रकार आशुतोष भांगले यांनी केले.सूत्रसंचालन नितीन नाईक यांनी केलं.तर आभार जय भोसले यांनी मानले.
यावेळी पत्रकार निलेश मोरजकर,मयूर चराटकर,प्रवीण परब,राकेश परब,अजित दळवी, शैलेश गवस,रामदास जाधव,विश्वनाथ नाईक,विराज परब,यश माधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते.