क्रीडा | विशेष : यंदाच्या आय.पि.एल.मधील संपूर्ण क्रिकेट जगाला हादरवणारी घटना सोमवारी घडली होती. सामन्या दरम्यान विराट कोहली विरुद्ध नाविद-उल-हक व नंतर विराट कोहली विरुद्ध गौतम गंभीर आणि शेवटी लखनौचा जवळपास सगळा संघ विरुद्ध विराट कोहली अशी धुमश्चक्री जगाने टेलिव्हिजन वर पाहिली.
वरील पैकी नावेद-उल-हक बाबतची घटना थोडी वगळून विचार करुया. भूतकाळात गेले तर काही गोष्टी लक्षात येतात ज्या आजवर निटशा चर्चिल्या गेल्या नव्हत्या त्या अशा की २००९ साली श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या वन डे मध्ये ३१६ धावांचा पाठलाग करताना भारताने सचिन व सेहवागला गमावूनही ते लक्ष्य पार केले होते. ज्यात गौतम गंभीरच्या १४ चौकार व ४ षटकारांसह १३४ चेंडूत नाबाद १५० धावा होत्या आणि ११७ चेंडूत १०७ धावा अशी तत्कालीन नवख्या विराटची कामगिरी होती. महत्वाचे म्हणजे ते विराट कोहलीचे ‘पहिले वन डे शतक’ होते..! ‘सामनावीराचा मान गौतम गंभीरला मिळाला परंतु त्याने तो पुरस्कार विराट कोहलीला देण्यात यावा असे समालोचकांना सांगितले’ होते. विराटही लगेच धावत आला आणि त्याने त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय शतकाला गौतीभाईने दिलेला सन्मान सर्वात महत्वाचा आहे असे मत व्यक्त केले. २०११ च्या पहिल्या अपयशी विंडिज कसोटी दौर्यानंतर तरुण विराटला तांत्रिक दृष्ट्या अभ्यास घडवणाराही गौतम गंभीरच होता. फक्त विराटसाठी म्हणून त्याने स्वतःची विश्रांती बाजुला ठेवून एन.सी.ए. मध्ये जात त्याला आठवडाभर मदत केली. त्यानंतर आय पि एल २०१३ , २०१६ व आता २०२३ मधील विराट विरुद्ध कोहली या घटना निश्चितच क्लेशदायी आहेत. २०१३ ला गंभीर आऊट झाल्यानंतर विराट जोरात ओरडला होता,” गोटी कल्टी मार..!” आता गौतम गंभीरला ‘गोटी’ म्हणण्या इतका विराट नक्कीच त्याचा समवयस्क नव्हता म्हणून गौतम गंभीरने त्याच्याशी हुज्जत घातली. २०१६ मध्येही असाच प्रकार घडला पण त्यावेळी विराटने ‘फ’ ची बाराखडी वापरली होती असे त्यावेळी दोन्ही संघात (के के आर व बेंगळुरु राॅयल चॅलेंजर्सचे) खेळाडू सांगतात. २०१४ मध्ये विराटने युवराज सोबतही काहीसा असाच प्रकार केला आणि गंमत म्हणजे तो व युवराज एकाच संघात होते..! आजकाल काही माजी खेळाडू जे समालोचन करत नाहीत ते त्यांच्या विविध मुलाखतींमधून विराटबद्दल जाहीर बोलू लागलेत.
गौतम गंभीर या क्रिकेट खेळाडूने मितभाषीपणे देशाला दोन विश्वचषक मिळवून दिले आहेत. तो विराट कोहली इतका ग्लॅमरस किंवा शैलीदार नव्हता हे मान्य परंतु त्याची ‘विजिगीषू’ वृत्ती ही कपिल देव, स्टीव्ह वाॅ, मायकल बेव्हन किंवा आजच्या स्टीव्ह स्मिथ इतकीच विशुद्ध होती. गौतम गंभीर याची आजची वक्तव्ये कधीकधी ‘भावनीक चाहत्यांना’ खटकत असतीलही परंतु ती वक्तव्ये ‘स्टॅटीस्टीक्स व खेळाडूचा सध्याचा फाॅर्म’ यावर अवलंबून असतात. खासदार वगैरे असूनही क्रिकेट व्यतिरिक्त फारसा कुठे न दिसणारा गौतम गंभीर हा कधीच कोणाचा ‘ गोंडस आवडता ‘ या श्रेणीत बसत नाही परंतु त्याच्या क्रिकेटींग अभ्यासाविषयी व ज्येष्ठ-कनिष्ठ प्रोटोकॉल विषयी कोणीच शंका घेणार नाही.
त्या निविद-उल-हकचेही संपूर्ण चुकच कारण तो प्रोटोकॉल विसरला किंवा त्यांच्या देशात क्रिकेट खेळाची संस्कृती नुकतीक रुजायला लागली आहे पण विराटच्या बाबतीत त्याचे आकडे व कामगिरी कितीही उंचावत गेली तरी ती गंभीरचा कनिष्ट सहकारी अशीच रहाणार आहे आणि आता तर गौतम गंभीर एका संघाचा प्रमुख प्रशिक्षक आहे हे विराट कोहली कसा काय विसरु शकतो ती कमालच. फुटबॉल खेळात प्रशिक्षक या पदाला आई वडिलांच्या दर्जाचे मानतात मग तो प्रशिक्षक प्रतिस्पर्धी संघाचा असला तरिही….तो अलिखीत नियम आहे. विराट कोहलीला पहिले आंतरराष्ट्रीय प्रोत्साहन दिलेला गौतम गंभीरच होता…विराट कोहलीला कसोटीसाठी पुन्हा उभा करु पहाणारा गंभीरच होता हे महत्वाचे.
एस.श्रीशांत बिग बाॅसच्या घरात गेला आणि तिथे रडत रडत त्याने मान्य केले होते की २००८ च्या त्या वादग्रस्त आय.पि.एल.सामन्यांत हरभरजनने अगदी सहज त्याच्या गालावर खेळकर टपली मारली होती परंतु त्यावेळी त्याने पराचा कावळा करत हरभजनने कानाखाली मारली असे सांगितले होते. श्रीशांतला पश्चात्ताप झालेला पण तो जवळपास १० वर्षांनंतर. पण एका चुकीमुळे हरभजनला पहिल्या आय पी एल स्पर्धेचे ७ सामने खेळता आले नव्हते व त्याची निष्कारण नामुष्की झाली होती हे सत्य श्रीशांतचा पश्चात्ताप बदलू शकत नाही…नसेल.
विराट कोहलीने आजही उठून गौतम गंभीरची विनम्र माफी मागितली तर कदाचित् निवृत्तीनंतर त्याला पश्चात्ताप होणार नाही. राहून राहून विराटवर किंवा त्याच्या खेळावर युवा वयापासून वस्तुनिष्ठ प्रेम केलेल्या गौतम गंभीर व काही अंशी युवराजला पाहून मनातल्या मनात वाटतं ,” प्रेम केलं येवढाच..त्याचा रे गुन्हा…!”
सुयोग पंडित | मुख्य संपादक