माजी नगरसेवक यतीन खोत, प्राणी मित्र शिल्पा खोत,पालिका कर्मचारी व सजग सहकार्यांचे आणखीन एक यशस्वी’बचावकार्य..!’ .
मालवण | सुयोग पंडित ( मुख्य संपादक ) : ‘अख्खं विश्व तिला म्हणते गाय, आम्ही म्हणतो लक्ष्मी माय, वसलेत तिच्यात देव तेहत्तीस कोटी, हनुमान बळ तिच्या शेपटी ‘ अशी सश्रद्धता बाळगणार्यांना या कवितेच्या ओळी कदाचित माहितही नसतील परंतु त्या कवितेच्या अर्थांची प्रत्यक्ष कृती ते करुन जातात तेव्हा त्या गायीच्या शेपटीतील ‘हनुमान बळ’ व इच्छाशक्ती किती बलवंतपणे श्रद्धावान समाज कार्य, पर्यावरण जतन आणि पशू पक्षी दयेची प्रचिती देते ते कळते. काल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात चिवला बीच लगत अशा बलवंत माणसांची प्रचिती आली.
चिवला बीच जवळील एका चाळीच्या मागील शौचालयाच्या टाकीत पडलेल्या एका गायीला माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्यासह प्राणीमित्र,शिवप्रेमी तसेच युवती सेना समन्वयक सौ.शिल्पा यतीन खोत आणि सहकारी व मालवण नगरपालिका कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर काढत कृतज्ञतापूर्वक जीवदान दिले ही माहिती खूप काही सांगून जाते.

त्या चाळीच्या मागच्या टाकीत गाय पडली असल्याची माहिती स्थानिक सजग नागरीक तथा व्यावसायिक राजा वालावलकर यांनी माजी नगरसेवक यतीन खोत यांना दिली. या घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक व माजी बांधकाम सभापती यतीन खोत यांच्यासह युवती सेना प्रमुख समन्वयक, शिवप्रेमी तसेच प्राणीमित्र सौ. शिल्पा यतीन खोत, दर्शन वेंगुर्लेकर, विनोद करंगुटकर, अशोक फर्नांडिस, निकित वराडकर, हसमुख पाटकर, आकाशवालावलकर,साळकर,दिलीप पवार तिथे दाखल झाले. पालिकेचे कर्मचारी आनंद वळंजू, सागर जाधव, रमेश कोकरे यांनाही बोलावून घेण्यात आले. टाकीत पडल्याने ती गाय संपूर्ण हतबल होती. अत्यंत काळजीपूर्वक दोरी बांधून त्या गायीला बाहेर काढत जीवदान देण्यात आले. यावेळेस मालवणचे सजग नागरिक राजू बिडयेही उपस्थित होते.

अस्वस्थ गायीला किंवा मुक्या पशू पक्ष्यांना शारीरिक संकटातून बाहेर काढून मोकळा श्वास द्यायची ही माजी नगरसेवक यतीन खोत यांच्यासह प्राणीमित्र सौ. शिल्पा यतीन खोत व इतर सहकार्यांची ही पहिलीच वेळ नव्हती. कालची वेळ मात्र वेगळी म्हणावी लागेल कारण ती टाकी ‘शौचालयाची’ होती. त्यात उतरत, अक्षरशः प्रचंड सश्रद्ध इच्छाशक्ती दाखवत गायीला सुखरुप बाहेर काढणार्यांना एकही श्लोक, स्तोत्र किंवा कविता पाठ नसली तरी निसर्ग त्यांना ‘पाठ थोपटून शाब्बासकी’ नक्कीच देतो.
या कालच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मालवण वासियांना ‘कै.महेश ऊर्फ डुबा गिरकर’ या एका अशाच बलवंताची तथा यतीन खोत व सौ. शिल्पा खोत यांच्या दिवंगत सहकारी समाज व प्राणी मित्राची आठवण आली असेलच…!