मालवणात टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग ग्राऊंडवर रंगणार कोकण नाऊ तर्फे ‘व्हेरेनिअम क्लाऊड’ आयोजीत ‘कोकण नाऊ प्रिमीअर लीग २०२३’ क्रिकेट स्पर्धा ; स्पर्धेचे सलग तिसरे यशस्वी वर्ष.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या टोपीवाला हायस्कूलच्या सुप्रसिद्ध बोर्डिंग ग्राऊंडवर , जिल्ह्याच्या डिजिटल प्रसार माध्यम क्षेत्रातील आघाडिचे नांव असलेल्या ‘कोकण नाऊ’ तर्फे ”व्हेरेनियम क्लाऊड’ आयोजित ‘कोकण नाऊ प्रीमिअर लीग २०२३’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अल्पावधीतच ‘क्रिकेटींग ग्लॅमर’ तथा एकूणच क्रीडा वलयांकीत अशा या स्पर्धेत महाराष्ट्रातील तसेच अन्य राज्यातील गाजलेल्या टेनिस क्रिकेटपटूंमध्ये १५ ते १९ फेब्रुवारी २०२३ दरम्यान चुरस अनुभवता येणार आहे. मागील दोन वर्षे कोकण नाऊ प्रीमिअर लीगला तुफान प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे या सलग तिसर्या वर्षीही या स्पर्धेचे यशस्वी नियोजन करण्यात आले आहे असे कोकण नाऊ चॅनेलचे संचालक विकास गांवकर यांनी सांगितले आहे.
१५ ते १९ फेब्रुवारी दरम्यान मालवणच्या बोर्डिंग मैदानावर क्रिकेटचा हा महासंग्राम होणार असून “कोकण नाऊ”च्या जगातील कानाकोपऱ्यातील दर्शकांना घरबसल्या युट्यूब, फेसबुक आणि केबल चॅनेलवर पाहता येईल. सिंधुदुर्ग जिल्हयातील ही नावाजलेली व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा असून ४ कॅमेऱ्यांनी प्रेक्षकांसाठी लाईव्ह स्वरूपात प्रसारित करण्यात येणार आहे. स्पर्धेत एमसीए मान्यताप्राप्त तज्ञ पंच आणि समालोचक या स्पर्धेसाठी उपलब्ध असतील. ही स्पर्धा खुल्या स्वरूपाची असून स्पर्धेत १६ संघाना सहभागी होता येणार आहे, अशी माहिती कोकण नाऊचे संचालक विकास गांवकर यांनी दिली आहे .
मालवणी समालोचन आणि ४ कॅमेर्यांसहीत संपूर्ण व्यावसायिक थेट प्रसारण ही या स्पर्धेची आणखीन वैशिष्टये आहेत.
‘व्हेरेनियम क्लाऊड’ आयोजित या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे पहिले बक्षीस रोख २ लाख ५१ हजार रुपये, साडे सहा फुट उंच आकर्षक चषक तर दुसऱ्या क्रमांकासाठी रोख १ लाख २५ हजार रुपये आणि आकर्षक चषक, तिसऱ्या क्रमांकासाठी रोख २५ हजार रुपये आणि आकर्षक चषक तसेच चौथ्या क्रमांकासाठी २१ हजार रुपये आणि आकर्षक चषक आणि उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक ही तसेच अन्य बक्षिसे आहेत. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघात जिल्ह्यातील तसेच अन्य राज्यातील नावाजलेले खेळाडू आपले कौशल्य दाखवतील. यामुळे ‘कोकण नाऊ’ च्या प्रेककांसाठी ही एक क्रीडा मेजवानी ठरणार आहे असेही संचालक विकास गांवकर यांनी स्पष्ट केले आहे.
मालवणच्या बोर्डिंग मैदानावर रंगणाऱ्या स्पर्धेच्या सर्व दिवसात क्रिकेटप्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळते. स्पर्धेत यावर्षी सुद्धा स्थानिक तसेच मुंबई, पुणे, कोल्हापूर, गोवा, कर्नाटक येथून संघ दाखल होणार आहेत. या स्पर्धेसाठी अधिकाधिक संघानी सहभाग दर्शवावा, असे आवाहन कोकण नाऊचे संचालक विकास गांवकर आणि संचालिका वैशाली गांवकर यांनी केले आहे.
बोर्डिंग ग्राऊंडची खेळपट्टी ही वानखेडे मैदानाचे माजी पिच क्युरेटर तसेच छत्रपती शिवाजी पार्क जिमखाना चेअरमन श्री प्रसाद मुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केली गेलेली खेळपट्टी असून यावर प्रवीण कुमार, रोहीत शर्मासारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू तर अंकित बावने, समद फल्लाह सारखे खेळाडू व जम्मू-काश्मीर, ओडिशा, झारखंड सारखे प्रथम श्रेणी क्रिकेट संघही सी.के.नायडू चषक खेळून गेलेले आहेत.