संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू, आंबा बागायतींना आग लागायची मालिका जवळपास गेले १५ दिवस सुरु आहे. त्यातील एक घटना ती देवगड तालुक्यातूनही समोर येत आहे. देवगड तालुक्यातील साळशी येथील हेदिचा आडवा(घाटोम) येथील काजू व आंबा कलमांना आग लागून ती जळून खाक झाली असून लाखोंचे नुकसान झाले आहे. साळशी येथील रहिवाशी दिलीप अनंत गावकर यांची हेदीचा आडवा (घाटोम) या ठिकाणी काजू व आंबा कलमाची बाग आहे. या बागेला सोमवारी दुपारी १२ च्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीत दिलीप गांवकर यांची ८०० काजू कलमे व ४० आंबा कलमे होरपळून जळून खाक झाली. यामध्ये त्यांचे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांच्या काजू कलमांना चांगला मोहर येऊन फलधारणा झाली होती. ऐन हंगामातच त्यांच्या हातचे पीक गेल्यामुळे ते चिंताग्रस्त झाले आहेत. तसेच चंद्रकांत गोपाळ गांवकर यांची ७० काजू कलमे व ४० आंबा कलमे आगीत जळून त्यांचे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
या घटनेचा पंचनामा साळशी ग्रामपंचायतचे उपसरपंच कैलास गांवकर, तलाठी श्वेतांजली खरात, कृषी सहाय्यक फाळके, साळशी पोलिस पाटील सौ. कामिनी नाईक, तंटामुक्ती अध्यक्ष प्रभाकर साळसकर, विजय सुतार यांनी घटनास्थळी जाऊन केला. तसेच प्रकाश साळसकर यांच्या ३० काजू कलमांना आग लागून नुकसान झाले आहे. याबाबत नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त बागायतदार शेतकरी यांनी केली आहे.