पैठण औरंगाबाद येथे संपन्न झालेली राज्यस्तरीय स्पर्धा.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि कोकण विभागातल्या सर्व भजनप्रेमींसाठी एक आनंदाची गोष्ट नुकतीच घडली आहे. आधी चिपळूण येथे झालेल्या कोकण विभागीय स्पर्धेतून प्रथम येत नंतर औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय भजन स्पर्धेत कामगार कल्याणच्या सावंतवाडी केंद्रामधून सहभागी झालेल्या श्री राधाकृष्ण संगीत साधनाच्या विद्यार्थिनी आणि सातपाटेकर भजन मंडळ निरवडे कोनापालच्या बुवा कु. गौरी पारकर यांनी उल्लेखनीय यश मिळवित तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाची विजेतेपद पटकाविले. तर वैयक्तिक तालसंचन प्रकारातही त्यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. याच स्पर्धेत गौरीच्या भजन मंडळाला पखवाज साथ करणारी श्री राधाकृष्ण संगीत साधना परिवारातील सदस्य ‘कु. प्राजक्ता परब’ सर्वोत्कृष्ट पख़वाज वादक पारितोषिकाची विजेते ठरल्या.
कु. गौरी सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावच्या सुकन्या असून त्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून येतात. बुवा विजय माधव यांचे त्यांना सूर,ताल व गायकीसाठी मार्गदर्शन लाभले
आणि श्री राधाकृष्ण संगीत साधनाच्या सौ. वीणा दळवी यांच्याकडे त्या शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहे. कु. प्राजक्ता परब वाफोली ता. सावंतवाडीच्या सुकन्या असून श्री आनंद मोर्ये सरांच्या शिष्या आहेत.
कु. गौरी पारकर, कु.प्राजक्ता परब आणि त्यांच्या सातपाटेकर भजन मंडळाची सर्व स्तरांतून प्रशंसा होत आहे.