मालवण तालुका श्रमिक मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी.
किनारपट्टी भागातील अनधिकृत पर्ससीन एल.ई.डी.मासेमारी संबंधातील कारवाईचा मुद्दा.
मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातले मच्छिमार नेते तथा मालवण तालुका श्रमिक मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष पृथ्वीराज ऊर्फ बाबी जोगी यांनी २३ जानेवारीला सहा.मत्स्यव्यवसाय आयुक्तांशी चर्चा करुन त्यांना एक निवेदन देत किनारपट्टी भागातील अनधिकृत पर्ससीन व एल.ई.डी. मासेमारीसंबंधात कारवाई होत नसल्याबद्दल २६ जानेवारीपासून भर समुद्रात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.
त्याला उत्तर देताना सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी पृथ्वीवर उर्फ बाबी जोगी यांना अनधिकृत पर्ससीन व एल.ई.डी.मच्छिमारी नौकांवर कारवाई करण्याकरिता सर्व उपाययोजना करण्यात आल्याने त्यांनी आंदोलनाचा मार्ग न स्विकारता प्रशासनाला सहकार्य करावे असे हमी पत्र दिले आहे. अनधिकृत पर्ससीन व एल.इ.डी. नौकांवर ‘बंदरात व समुद्रात’ कारवाई करण्याकरिता आता तालुकानिहाय अधिकारी,कर्मचारी व सागरी सुरक्षा रक्षकांची पथके नेमण्यात आली असून त्यांना अनधिकृत पर्ससीन व एल.ई.डी. मासेमारी नौकांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले गेले असल्याचा निर्वाळा सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी पृथ्वीवर उर्फ बाबी जोगी यांना पत्राद्वारे दिला आहे.
हे पत्र मिळाल्यानंतर या संदर्भात दिलेला आदोलनाचा इशारा आपण स्थगित करत आहोत परंतु भविष्यात याची अंमलबजावणी झाली नसेल तर श्रमिक तथा पारंपरिक मच्छिमार बांधवांची हक्काची रोटी हिसकावून घेण्याचे डाव हाणून पाडले जातील व त्यासाठी नाईलाजाने आंदोलन करावे लागेल असे प्रतिपादन केले आहे.
तूर्तास तरी उद्यापासून सुरु होणारे आंदोलन मत्स्यव्यवसाय आयुक्तांनी पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी यांना दिलेल्या पत्रामुळे टळले आहे.